आजी माजी सैनिक तालुका वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने प्रांताधिकार्यांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील पंचायत समितीच्या बचत भवन शेजारील आजी-माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या जागेवर अतिक्रमण झाले असून सदर जागा खुली करुन देण्यात यावी अशी मागणी आजी-माजी सैनिक तालुका वेल्फेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फौंडेशनच्या वतीने वतीने प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन देण्यात आले. हे निवेदन निवासी नायब तहसीलदार विष्णू बुट्टे यांनी स्वीकारले.
निवेदनात म्हटले की, गडहिंग्लज तालुक्यात माजी सैनिकांची संख्या सुमारे ३५०० इतकी आहे. सैनिकांच्या शासकीय व इतर कामकाजासाठी पंचायत समिती बचत भवनच्या बाजूला माजी सैनिकांसाठी राखीव जागा असे फलक लावून ठेवले होते. मात्र सदर जागेवर अतिक्रमण करुन या ठिकाणी गाळा घातला आहे. याबद्दल नगरपरिषदेच्या मिळकत विभाग येथे चौकशी केली असता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे भाडे आकारले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच पंचायत समितीकडेही चौकशी केले असता ही जागा जिल्हापरिषदेच्या नावे असल्याचे सांगण्यात आले.
सदर गाळा हा शासकीय जमिनीवर कोणाच्या परवानगीने घातला आहे हे माहित नाही. या ठिकाणी असलेल्या लिंबाच्या झाडावर 'माजी सैनिकांसाठी राखीव जागा' असे फलक होते असे तालुक्यातील वरिष्ठ माजी सैनिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे याबाबत माहिती घेऊन तत्काळ सदर जागा खाली करुन आजी-माजी सैनिकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी कार्यालय सुरु करण्यास जागा खुली करुन द्यावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
या निवेदनावर माजी सैनिक कुमार पाटील, शिवाजी भोसले, धनाजी चव्हाण, श्रीकांत शिंदे, मारुती चोपडे, जयवंत नगरे, बाळू पोवार, सुबराव पाटील, शशी जाधव, संदीप राक्षे, बाळकृष्ण भोसले, गणपती सावंत, ईश्वर मोरे, चंद्रकांत लष्करे, भरत येडुरे, बाळासाहेब भोसले आदींच्या सह्या आहेत.