Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मडिलगे येथील 'तो' दरोडा नव्हे, पतीच निघाला मारेकरी

सोने गहाण ठेवण्यास नकार दिल्याने केला पत्नीचा खून


अवघ्या 24 तासातच पोलिसांनी केला  पर्दाफाश 




आजरा (हसन तकीलदार ) : आजरा तालुक्यातील मडिलगे येथे रविवारी घडलेल्या दरोडा प्रकरणाचा तपास पोलिसांनी गतीने करत या प्रकरणाचा अवघ्या 24 तासाच्या आतच उलगडा केला आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून व आपल्याला झालेल्या सोरायसिस या आजारावर उपचाराकरिता पत्नी सोने गहाण ठेवण्यासाठी देत नाही या रागातून पती सुशांत सुरेश गुरव यानेच पत्नीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. हा दरोडा नव्हे तर बनाव असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सुशांत गुरव याला पोलिसांनी अटक करत या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.



सुशांत गुरव याने बऱ्याच लोकांकडून व बँकेकडून कर्ज घेतलेली आहेत. तो कर्जबाजारी असल्याने ते परत करण्यासाठी सुशांत हा त्याची पत्नी पुजा गुरव हिच्याकडे सोन्याचे दागिणे गहाण ठेवून पैसे काढून लोकांची देणी व बँकेचे कर्ज भागवूया तसेच आपल्याला असलेल्या सोरायसीस या आजारावर औषधोपचार करुया असे म्हणत होता. दिनांक 18 मे रोजी मध्यरात्री 02.45 वाजण्याच्या  सुमारास सुशांत व पत्नी पुजा या दोघांमध्ये वादावादी झाली. पत्नी पुजा हिने यापूर्वी देखील तुमच्या आजोबांच्या आजारपणावेळीपण सोने गहाण ठेवले होते. आता मी सोने देणार नाही. तुम्ही काय करायचे करा असे म्हणाल्याने सुशांत याने रागाच्या भरात घरातच असलेल्या दगडाने व शेतात काम करण्याच्या छोट्या फावड्याने (खोऱ्याने)  पुजा हिच्या डोक्यात मारहाण करुन ठार मारले. त्यानंतर दरोड्याचा बनाव रचल्याची कबुली त्यांनी दिली आहे. सदर गुन्ह्याचा कौशल्यपूर्वक तपास करुन फिर्यादी हाच आरोपी असल्याचे निष्पन्न करुन गुन्हा 24 तासांच्या आत पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी सुशांत याच्याकडून दागिने हस्तगत केले आहेत.



तपास करीत असताना फिर्यादी सुशांत याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती घेत असताना सदरची घटना ही खुन व दरोडा पडला आहे असे भासवण्याचा प्रयत्न करीत होता. फिर्यादी याचा बनाव हा तपास पथकाच्या निदर्शनास आल्याने तपास पथकाने फिर्यादी यांच्याकडून गुन्ह्याचे प्रात्यक्षिक करुन घेत असताना त्याने दिलेला फिर्यादी जबाब व प्रात्यक्षिक यामध्ये संदिग्धता असल्याचे आढळून आले. त्यामुळे फिर्यादी याच्यावर संशय बळावल्याने घटनास्थळावरील परिस्थिती, भौतीक पुरावे, गोपनीय माहिती तसेच फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडे अत्यंत कौशल्यपूर्वक तपास करीत असताना सदरचा गुन्हा हा फिर्यादी सुशांत गुरव यानेच केल्याचे निष्पन्न झाले व पोलिसांनी त्याचा पर्दाफाश केला. 



सदरचा गुन्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक  निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली एल.सी.बी. चे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर, आजरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक मोरे, गळवे, पोलीस अंमलदार समिर कांबळे, प्रकाश पाटील, सतिश जंगम, अमित सर्जे, दिपक घोरपडे, कृष्णात पिंगळे, राजु कांबळे, विशाल चौगले, संदिप बेंद्रे, विजय इंगळे, सचिन जाधव, सोमराज पाटील, रोहित मर्दान, राजेश राठोड, सुहास कांबळे, सुशिल पाटील, हंबिरराव अतिग्रे, अनिल जाधव व स्टाफ पोउनि. संजय पाटील, पोउनि. युवराज धोंडे, कविता कदम, संदिप म्हसवेकर, साजिद शिकलगार, दयानंद बेनके, पांडुरंग येलकर, रेश्मा नाईक, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कांबळे, नितीन पाटील, अमर उबाळे, विकास कांबळे, वैभव गवळी, सुर्यकांत सुतार, संजय नवलगुंदे, महांतेश पाटील, दत्तात्रय शिंदे, प्रशांत सुतार, रामदास वाघ, प्रकाश पुजारी, विशाल आंबोळे, दिपक किल्लेदार, सुशांत सिंघन यांनी उघडकिस आणला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.