पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशी निमित्ताने वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला.
वातावरण टाळ, मृदंग आणि विठू माऊलीच्या नाम गजरात भक्तीरसात न्हाऊन निघाले. प्रारंभी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे श्री माऊलींची प्रतिमा देऊन स्वागत केले.
वाखरी येथे जिल्हा प्रशासनामार्फत वारकरी, भाविक यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणी देखील मुख्यमंत्री फडणीस यांनी केली. वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर, अभिजित पाटील, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी आमदार राम सातपुते यांच्यासह हजारो वारकरी भाविक उपस्थित होते.