घरातील सोने व रोकड घेऊन दरोडेखोरांचे पलायन ; पोलिसांचा तपास सुरू
आजरा (हसन तकीलदार): मडिलगे (ता. आजरा) येथे माजी उपसरपंच सुशांत गुरव यांच्या घरावर चौघा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत त्यांच्या पत्नी पूजा गुरव (वय ३१) यांचा निर्घृण खून केला. दरोडेखोरांनी घरातील १४ तोळे सोने व नऊ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेत पती सुशांत गुरव यांना देखील दरोडेखोरांनी जबर मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद सुशांत सरेश गुरव (वय ३२) यांनी आजरा पोलिसात दिली आहे. पोलीस तपासानंतरच या घटनेचा नेमका उलगडा होणार आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, आजरा तालुक्यातील मडिलगे येथे गुरव गल्लीत सुशांत गुरव यांचे घर आहे. सुशांत गुरव हे वारकरी असून पती-पत्नी दोघेही आचारी म्हणून काम करतात. दरम्यान, रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सुशांत गुरव यांना जाग आल्यानंतर ते बाथरूमला गेले होते त्याच दरम्यान चौघा दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. या दरोडेखोरांनी दाराला कडी लावत पूजा गुरव यांच्या तोंडाला रुमालने दाबून धरत डोक्यात धारदार शस्त्राने वार केले व त्यांच्या अंगावरील सोने व घरात ठेवलेली रोकड काढून घेतले. पूजा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. घरातून ओरडण्याचा आवाज आल्याने बाथरूमला गेलेले सुशांत गुरव हे दरवाजा तोडून घरात आले. त्याचदरम्यान एका दरोडेखोराने त्यांना देखील जबर मारहाण केल्याने ते जखमी झाले.
घरातील सोने व रोकड घेऊन दरोडेखोर पसार झाल्यानंतर सुशांत यांनी मुलांना घराबाहेर घेऊन येत गल्लीत जोरदार आरडाओरडा केल्याने ग्रामस्थांना ही घटना समजली. ग्रामस्थांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. दरम्यान श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले. मात्र श्वान घराभोवतीच घुटमळले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. हा नेमका दरोडा की खून? या दिशेने पोलिसांनी तपास करायला सुरू केला आहे. सुशांत गुरव यांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दरोडेखोरांनी नेमका किती ऐवज लंपास केला याची माहिती जबाबा नंतरच मिळणार आहे.