Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सशस्त्र दरोडेखोरांकडून महिलेचा खून ; 10 लाख 35 हजाराचा मुद्देमाल पळविला

आजरा तालुक्यातील मडिलगे येथील घटनेने खळबळ 


दरोडेखोरांच्या मारहाणीत पती जखमी ; पोलीस तपास वेगाने सुरू 





आजरा (हसन तकीलदार): मडिलगे (ता. आजरा) येथे माजी उपसरपंच सुशांत गुरव यांच्या घरावर चौघा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत त्यांच्या पत्नी पूजा गुरव (वय ३१) यांचा निर्घृण खून केला. दरोडेखोरांनी घरातील साडेदहा तोळे सोने व 90 हजार रुपयांची रोकड लंपास केला आहे. या घटनेत पती सुशांत गुरव यांना देखील दरोडेखोरांनी जबर मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद सुशांत सरेश गुरव (वय ३२) यांनी आजरा पोलिसात दिली आहे.



याबाबतची अधिक माहिती अशी की, आजरा तालुक्यातील मडिलगे येथे गुरव गल्लीत सुशांत गुरव यांचे घर आहे. सुशांत गुरव हे वारकरी असून पती-पत्नी दोघेही आचारी म्हणून काम करतात. दरम्यान, रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सुशांत गुरव यांना जाग आल्यानंतर ते बाथरूमला गेले होते त्याच दरम्यान चौघा दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. या दरोडेखोरांनी दाराला कडी लावत पूजा गुरव यांच्या तोंडाला रुमालने दाबून धरत डोक्यात धारदार शस्त्राने वार केले व त्यांच्या अंगावरील सोने व घरात ठेवलेली रोकड काढून घेतले. पूजा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. घरातून  ओरडण्याचा आवाज आल्याने  बाथरूमला गेलेले सुशांत गुरव हे दरवाजा तोडून घरात आले. त्याचदरम्यान एका दरोडेखोराने त्यांना देखील जबर मारहाण केल्याने ते जखमी झाले. 



घरातील सोने व रोकड घेऊन दरोडेखोर पसार झाल्यानंतर सुशांत यांनी मुलांना घराबाहेर घेऊन येत गल्लीत जोरदार आरडाओरडा केल्याने ग्रामस्थांना ही घटना समजली. ग्रामस्थांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. दरम्यान श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले. मात्र श्वान घराभोवतीच घुटमळले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले.


 

पिवळ्या रंगाचा शर्ट आणि तोंडाला मास्क 


 त्या चौघाही दरोडेखोरांनी पिवळ्या रंगाचे शर्ट घातले होते व तोंडाला काळपट मास्क बांधला होता, असे सुशांत गुरव यांनी पोलिसांना सांगितले आहे. या दरोडेखोरांनी पूजा यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुशांत यांच्या पाठीवर जोरदार मारहाण केल्याने ते जखमी झाले. 



10 लाख 35 हजाराचा मुद्देमाल लंपास 


या चौघाही दरोडेखोरांनी सुशांत गुरव यांच्या घरातील सोने व रोकड मिळून एकूण दहा लाख 35 हजारांचा मुद्देमाल पळविला आहे. यामध्ये एक तोळ्याची बोरमाळ, सव्वा दोन तोळे वजनाची दोन पदरी माळ, अर्धा तोळे कर्णफुले, दोन तोळ्यांचा लक्ष्मी हार, सव्वा दोन तोळ्याची गंठण, सव्वा तोळ्याचा नेकलेस, सव्वा तोळ्याची चैन व 90 हजार रुपयांची रोकड यांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.