स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथील महाराणी राधाबाई माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशालेचे (एम. आर.) प्रभारी प्राचार्य संजय कुंभार यांची झालेली बदली रद्द करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना, माजी विद्यार्थी व पालकांनी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, एम. आर. हायस्कूलची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात सन १९२३ साली झाली आहे. या हायस्कूलमध्ये गडहिंग्लज विभागातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च पदापर्यंत पोहचून स्वातंत्र्य लढ्यापासून देश स्वतंत्र झाल्यानंतर राष्ट्र निर्मिती बांधणी मध्ये महत्वाची कामगिरी बजावली आहे. आशा या ऐतिहासिक वारसा असलेल्या शासकीय शाळेचा माध्यमिक विभाग ( ५ वी ते १० वी) पटसंख्याअभावी बंद पडते की काय अशी केविलवाणी अवस्था तयार झाली होती. अशातच सन २०२१ मध्ये संजय कुंभार यांनी प्रभारी प्राचार्य म्हणून रुजू झाल्यानंतर इयत्ता ५ वी ते १० वी पटसंख्या २ विद्यार्थी होती ती टप्प्या टप्प्याने विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यात प्रेरणा निर्माण करून माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य घेऊन शैक्षणिक उठाव करून सदर शाळेला गतवैभव प्राप्त करण्याच्या दृष्टीने सर्वांना सोबत घेऊन लोकवर्गणीतून जवळ जवळ २२ लाख रुपये खर्च करून शैक्षणिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून या शाळेचा पट ३०० पर्यंत पोहोचवण्या मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
या शाळेबाबत असलेला नकारात्मक दृष्टीकोन बदलून सकारात्मक दृष्टीकोन विद्यार्थी पालक यांच्यात निर्माण झालेला आहे. ही कामगिरी श्री. कुंभार यांनी कृतीतून करून दाखवून दिली आहे.
एका नामांकित शाळेला लागलेली घरघर थांबवून सदर शासकीय शाळा कात टाकली. प्राप्त परिस्थितीतील नवी आव्हाने स्वीकारून उत्तम विद्यार्थी घडवण्यासाठी सज्ज झालेली आहे. या शाळेत येणारे हे विद्यार्थी सर्व सामान्य कुटुंबातील असतात म्हणून ही शासकीय शाळा शास्वत टिकावी, भविष्यात या शाळेतून हजारो विद्यार्थी घडावेत अशी अपेक्षा या विभागातील शिक्षण प्रेमी, पालकांची व माजी विद्यार्थ्यांची आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्राप्त परिस्थितीमध्ये संजय कुंभार यांची झालेली बदली रद्द करून आहे त्या ठिकाणीच त्यांना कायम करावे अशी अपेक्षा विद्यार्थी पालक माजी विद्यार्थी संघटना आणि हीच मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे.
विना विलंब तात्काळ श्री कुंभार यांची बदली रद्द करून आहे त्या ठिकाणी त्यांना पूर्ववत करावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक व माजी विद्यार्थी संघटना तसेच विविध सामाजिक संघटना, शिक्षण प्रेमी नागरिक यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा या निवेदनातून दिला आहे.
निवेदनावर राजेंद्र गड्यानावर, धनाजी पाटील, आप्पासाहेब चौडाज, सुरेश पोवार, अशोक पाटील, शिवलिंग चौडाज, आकाश भोसले, संतोष पाटील, राहुल धुळाज, सौरभ सावंत यांच्यासह इतरांच्या सह्या आहेत.