बहुजन मुक्ती पार्टीचे चंदगड आगारप्रमुखांना निवेदन
चंदगड (हसन तकीलदार) : चंदगड तालुक्यातील होसूर भागातील बुक्कीहाळ, कौलगे, कल्याणपूर तसेच कुरेकुडी या गावाना बससेवा अद्याप सुरु झालेलीच नाही. बऱ्याच वर्षापासून ही गावे बस सेवेपासून वंचित आहेत. त्यामुळे विद्यार्थी, वृद्ध तसेच रुग्णांना याचा फटका बसत आहे. त्यासाठी या गावाना त्वरित बस सेवा सुरु करून गावकऱ्यांची होणारी गैरसोय चंदगड आगाराने दूर करावी असे निवेदन बहुजन मुक्ती पार्टीचे चंदगड प्रभारी अमित तरवाळ यांनी चंदगड आगारप्रमुखांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, होसूर भागातील नागरिकांना शिक्षण, दवाखाना, आरोग्याच्या सुविधा, शासकीय कामे, आठवडी बाजार यासारख्या कामासाठी कोवाड, पाटणे फाटा, चंदगड या बाजार पेठेवर अवलंबून रहावे लागते. तसेच गावातील मुले मुली प्राथमिक, माध्यमिक तसेच पदवी शिक्षणासाठी कोवाड, हलकर्णी, कारवे, सुंडी या ठिकाणी जात असतात. बुक्कीहाळ ते सुंडीपर्यंत जाण्यासाठी दररोज 7कि. मी. पायपीट करावी लागते. होसूर पर्यंत 4कि. मी. तर कल्याणपूर ते कागणी पर्यंत 1ते 2कि. मी. चा पायी प्रवास करावा लागत आहे.
वृद्ध व रुग्णांना आरोग्य केंद्र कोवाड येथे वैद्यकीय सुविधेसाठी जावे लागते. चंदगड तहसील कार्यालयात कोवाड मार्गे चंदगडला जावे लागते. या गावातील लोकांची बस सुविधेअभावी होत असलेली गैरसोय थांबवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांची पायपीट थांबवण्यासाठी चंदगड आगाराने लवकरात लवकर या गावाना चंदगड ते बुक्कीहाळ मार्गे कोवाड ही बससेवा तात्काळ सुरु करावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर बुकीहाळचे सरपंच जोतिबा बिर्जे, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रभारी अमित तरवाळ, आजऱ्याचे प्रचारक अमित सुळेकर, लक्ष्मण आमरोळकर, विक्रम बिर्जे, संजू कडलगेकर, अनिता बिर्जे, पार्वती बिर्जे, परशराम बिर्जे, रोशन बिर्जे, पोलीस पाटील सटुप्पा मेणसे, कौलगे सरपंच प्रकाश केदनुकर, उपसरपंच मल्लाप्पा आतवाडकर, आदित्य बिर्जे, गौरव चव्हाण, प्रशांत आमरोळकर, कल्पना आमरोळकर, यश बिर्जे, साहिल बिर्जे, लक्ष्मण कांबळे आदींच्या सह्या आहेत.