श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले निवेदन
आजरा (हसन तकीलदार ) : दोन मिटर उंची वाढवल्याने बुडीत होणाऱ्या क्षेत्राचे नवीन कायद्याने संपादन होऊन पुनर्वसनाचा लाभ मिळाला पाहिजे, 65टक्के रक्कम कपात करून घेऊन संकलन दुरुस्त करून प्रकल्पग्रस्ताना पुनर्वसनाचा लाभ द्यावा याबाबत 5 मे पर्यंत जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक न झाल्यास मोर्चाने जाऊन धरणाचे काम बंद करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
कोल्हापूर पाटबंधारे परिमंडल कार्यालयाच्या अधीक्षक अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उचंगी प्रकल्पाची दोन मीटरने उंची वाढवण्याची प्रक्रिया आपल्या कार्यालयाकडून सुरु झाली असून ही उंची वाढवल्याने नव्याने बाधित होणाऱ्या क्षेत्राचे रेखांकन केले आहे. उंची वाढवल्यानंतर बाधित होणाऱ्या क्षेत्राचे संपादन नवीन भुसंपादन कायद्याने करावे. भुसंपादन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नव्याने बाधित होणाऱ्या क्षेत्राची 65 टक्के रक्कम कपात करून घेऊन संकलन दुरुस्त करून प्रकल्पग्रस्ताना लाभ द्यावा. दोन मिटर उंची वाढवल्याने काही घरे बुडीतात येतात त्यांचे भुसंपादन कायद्याने संपादन करावे. पूर्वी संयुक्त मोजणी होऊन पंचनामा, मूल्यांकन झालेल्या पण संपादनातून वगळलेल्या घरांचे संपादन होऊन त्याची संपादन रक्कम त्यांना द्यावी. त्याचप्रमाणे पूर्वी संपादित झालेल्या आणि बुडीतात गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्यांची सोडवणूक व्हावी. नव्याने बाधित होणाऱ्या क्षेत्राचे संपादन न करता थेट खरेदी करून पुनर्वसनाचा हक्क मिळणार नाही अशी माहिती आपल्या क्षेत्रीय अधिकाऱ्याकडून प्रकल्पग्रस्ताना दिली जात आहे त्यामुळे प्रकल्पग्रस्त लोकांच्या मनात संभ्रम तयार झाला आहे. या सर्व बाबीवर निर्णायक चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेसोबत प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधीसह सोमवार दि. 5 मे रोजी पर्यंत बैठक न झालेस मंगळवार दि. 6 मे रोजी सर्व प्रकल्पग्रस्त मोर्चाने जाऊन धरणाचे काम बंद करणार असल्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रति पालकमंत्री कोल्हापूर, जिल्हाधिकारी कोल्हापूर, उपविभागीय अधिकारी व उपअभियंता भुदरगड आजरा यांना देण्यात आल्या आहेत.
निवेदनावर श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉम्रेड संपत दिसाई, नारायण भडांगे, निवृत्ती बापट, दशरथ घुरे, विजय पाटील, शामराव पोवार, शिवाजी बापट यांच्यासह प्रकल्पग्रस्तांच्या सह्या आहेत.