Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नंदनवाडचे जवान अविनाश कागिनकर यांचे हिमाचल प्रदेशमध्ये हृदयविकाराने निधन

 हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाला येथे बजावत होते सैन्यदलात सेवा

हलकर्णी परिसरावर शोककळा 

नातेवाईकांसह ग्रामस्थांना पार्थिवाची प्रतिक्षा


हलकर्णी : ( सुनील भुईंबर ): 
नंदनवाड (ता. गडहिंग्लज) येथील जवान अविनाश आप्पासाहेब कागिनकर यांचे हिमाचल प्रदेश येथील धर्मशाला येथे सेवा बजावत असताना हृदय विकाराने निधन झाले. यामुळे नंदनवाड गावावर शोककळा पसरली आहे. पार्थिव उद्या पर्यंत नंदनवाड येथे आणण्यात येणार आहे.

 सैन्यदलात जवान अविनाश कागिनकर हे शिपाई पदावर कार्यरत होते. दि. २६ जून रोजी सकाळी त्यांच्या निधनाची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली. जवान अविनाश यांच्या निधनाची बातमी घरातील सदस्यांना अद्याप सांगण्यात आलेले नाही.दरम्यान, मंगळवार दि.२८ रोजी सायंकाळपर्यंत त्यांचा पार्थिव खास विमानाने सांबरा विमानतळ बेळगाव येथे आणण्यात येणार आहे. गावातील श्री रामलिंग मंदिर शेजारी गायरानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थातून सांगण्यात आले. घरची परिस्थिती बेताची असल्याने सैन्यातच भरती होऊन दाखवायचे अशी त्यांची जिद्द होती. बारावीनंतर संत गजानन पॉलीटेक्निक स्कुल महागाव येथून कॉम्प्युटर सायन्स मधून डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर २०१५ मध्ये बैंगलोर मधील आर्मी सप्लाय कोअर सेंटरमध्ये सैन्यात भरती होऊन आपले स्वप्न पूर्ण केले. ऑगस्ट २०१८ मध्ये गावातीलच राजलक्ष्मी यांच्याशी जवान अविनाश यांचा विवाह झाला आहे. 

अंत्यसंस्काराच्या तयारीबाबत सरपंच शेवंता मगदुम, उपसरपंच बाबु केसरकर, मंडल अधिकारी व्ही.ए.कामत यांनी भेट देऊन जागेची पाहणी करून मार्गदर्शन केले. तलाठी शिवपुत्र हिरेमठ, ग्रामसेवक दत्ता पाटील, गावातील आजी-माजी सैनिक, तरुण मंडळाचे कार्यकर्ते नियोजन करत आहेत.

महिन्यानंतर दुसरी घटना

गडहिंग्लज पूर्व भागातील बसर्गेतील जवान प्रशांत शिवाजी जाधव हे २७ मे रोजी लडाख येथे झालेल्या दुर्घटनेत शहीद झाले होते. त्यानंतर आता नंदनवाड येथील जवान अविनाश कागिनकर यांचे हिमाचल प्रदेश मध्ये दिनांक २७ जून रोजी निधन झाल्याने हलकर्णी परिसरावर पुन्हा एक महिन्यांनी शोककळा पसरली आहे. महिन्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.