Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

"माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार"......!

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (९० वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधला संवाद


नवी दिल्ली (सौजन्य: पीआयबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (९० वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी विविध विषयांवर संवाद साधला. वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले......

 माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’साठी मला आपल्या सर्वांकडून अनेक पत्रे मिळाली. समाज माध्यमं आणि नमो ॲपवरही अनेक संदेश आले आहेत. त्यासाठी मी आपल्या सर्वांचा खूप आभारी आहे. या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचा प्रयत्न असतो की, एकमेकांनी केलेल्या प्रेरणादायी प्रयत्नांविषयी चर्चा व्हावी, जन-आंदोलनातून परिवर्तनाची गाथा संपूर्ण देशाला सांगितली जावी. याच शृंखलेमध्ये आज मी आपल्याबरोबर, देशात झालेल्या एका आशा लोक चळवळीविषयी चर्चा करू इच्छितो. मात्र त्याआधी मी आजच्या युवा पिढीला, 24-25 वर्षांच्या युवकांना एक प्रश्न विचारू इच्छितो.  आणि हा प्रश्न खूप गंभीर आहे. तसंच तुम्ही सर्वांनी माझ्या या प्रश्नावर जरूर विचार करावा, असं मला वाटतं. ज्यावेळी तुमचे आई-वडील तुमच्या वयाचे होते, त्यावेळी एकदा त्यांच्याकडून जगण्याचा अधिकारच काढून घेतला होता, हे तुम्हा मंडळींना माहिती आहे का?   माझ्या नवतरूण मित्रांनो,  आपल्या देशामध्ये मात्र,  एकदा असे घडले होते. काही वर्षोंपूर्वी म्हणजेच, 1975 सालची ही गोष्ट आहे. जून महिन्यात, म्हणजे याच काळात देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यामध्ये देशातल्या नागरिकांचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले होते. त्यापैकीच एक अधिकार, जो घटनेतल्या कलम 21 अंतर्गत सर्व भारतीयांना मिळाला आहे-  ‘राइट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी’- म्हणजेच ‘जगण्याचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क! त्या काळी भारतातल्या लोकशाहीला पायदळी तुडविण्याचा प्रयत्न केला गेला. देशातली न्यायालये, प्रत्येक घटनादत्त संस्था, प्रकाशन संस्था - वर्तमानपत्रे, अशा सर्वांवर नियंत्रण, अंकूश लावण्यात आले होते. लावलेल्या सेन्सॉरशिपमुळे सरकारच्या स्वीकृतीविना काहीही छापणे, प्रसिद्ध करणे शक्य नव्हते. मला आठवतेय, त्याकाळामध्ये लोकप्रिय गायक किशोर कुमार यांनी सरकारची ‘‘वाहवाह’’, करण्यास नकार दिला म्हणून त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. असे अनेक प्रकारचे  प्रयत्न केले,  हजारो लोकांना अटक केली गेली.भारतातल्या लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास डळमळीत झाला नाही की हा विश्वास कणभरही कमी झाला नाही. भारतातल्या आपल्या लोकांवर अनेक युगांपासून जे लोकशाहीचे संस्कार झाले आहेत, सर्वांमध्ये लोकशाहीची जी भावना नसा-नसांमध्ये भिनली आहे, शेवटी त्याच भावनेचा विजय झाला. भारतातल्या लोकांनी लोकशाही पद्धतीनेच आणीबाणी हटवून, पुन्हा एकदा लोकशाहीची स्थापना केली. हुकूमशाहीच्या मानसिकतेचा, हुकूमशाहीच्या वृत्ती-प्रवृत्तीचा  लोकशाहीच्या पद्धतीने पराभव केला जाणे,  असे  उदाहरण संपूर्ण जगामध्ये पहायला मिळणे अवघड आहे. आणीबाणीच्या काळामध्ये देशवासियांच्या संघर्षाचे  साक्षीदार होण्याचे, लोकशाहीचा एक सैनिक या  नात्याने - या घटनेचा भागीदार होण्याचे भाग्य मलाही मिळायचे होते.  आज, ज्यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन म्हणजेच अमृत महोत्सव  साजरा करीत आहे, त्यावेळीही आणीबाणीचा तो भयावह काळ  आपण कधीच विसरून चालणार नाही. आगामी पिढ्यांनाही त्याचे विस्मरण होवू नये. अमृत महोत्सव म्हणजे शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून झालेल्या मुक्ततेची विजयी गाथाच आहे, असे नाही ; तर स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांच्या प्रवासाचाही त्यामध्ये सहभाग आहे. इतिहासाच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यांकडून नवे काही शिकून, आपण पुढे जात असतो.

पंतप्रधान म्हणाले,आपल्या जीवनात कधी ना कधी आकाशाशी संबंधित कोणती ना कोणती, कल्पना मनात आली नाही, असे फारच विरळा उदाहरण असेल. बहुतेक प्रत्येकाच्या मनात आकाशाशी संबंधित एखादी तरी कल्पना नक्कीच आली असणार. लहानपणी प्रत्येकालाच आकाशातल्या चंद्र-ता-यांच्या कथा आकर्षित करतात. युवकांना आकाशाला गवसणी घालत, स्वप्नांना साकार करण्याचा पर्याय असतो. आज आपला भारत ज्यावेळी इतक्या सा-या क्षेत्रांमध्ये यश मिळवून आकाशाला गवसणी घालत आहेत. त्यावेळी आकाश, अथवा अंतराळ ही क्षेत्रे अस्पर्शित राहतील, हे कसे काय शक्य आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या देशामध्ये अंतराळ क्षेत्राशी संबंधित अनेक मोठी कामे पार पडली आहेत. देशाच्या याच यशापैकी एक म्हणजे, ‘ इन-स्पेस’ या नावाच्या संस्थेची निर्मिती आहे. ही एक अशी एजन्सी आहे की, अंतराळ क्षेत्रामध्ये भारताच्या खाजगी अंतराळ  क्षेत्रासाठी असलेल्या नव्या संधींना प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे. या कामासाठी प्रारंभीच देशातल्या युवा वर्गाला विशेषत्वाने आकर्षित केले आहे. या क्षेत्राशी जोडले गेलेल्या अनेक युवकांचे संदेश यावेळी मला मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वीच मी ‘इन-स्पेस’च्या मुख्यालयाचे मी लोकार्पण करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी अनेक युवकांच्या स्टार्ट-अप्सच्या कल्पना, त्यांचा उत्साह पाहिला. त्यांच्याबरोबर मी बराच वेळ बोललो, त्यांच्याशी संवादही साधला.  तुम्हालाही याविषयी, त्यांच्या कामाविषयी जाणून खूप नवल वाटेल. आता अंतराळसंबंधी स्टार्ट-अप्सची वाढणारी संख्या आणि या व्यवसायांचे होणारे वेगवान काम यांचा विचार केला तर लक्षात येते, काही वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये अंतराळ क्षेत्रामध्ये स्टार्ट-अप्सविषयी कोणीही साधा विचारही करीत नव्हते. आज त्यांची संख्या शंभराहून जास्त आहे. हे सर्व स्टार्ट-अप्स इतक्या नाविन्यपूर्ण कल्पनांवर काम करीत आहेत, की त्याविषयी याआधी कोणी विचारही करीत नसायचे. त्याचबरोबर खाजगी क्षेत्रासाठी तर अशा गोष्टी करणे केवळ अशक्य आहेत, असेच मानले जात होते. याचे उदाहरण म्हणून चेन्नई आणि हैद्राबादच्या दोन स्टार्ट-अप्सचे देता येईल. ‘अग्निकुल’ आणि -‘स्कायरूट’ हे  स्टार्ट-अप्स ‘लाँच व्हेईकल’ म्हणजेच ‘प्रक्षेपण वाहने’ विकसित करीत आहेत. त्यामुळे अंतराळामध्ये लहान ‘पेलोडस्’ घेवून जातील. यामुळे अंतराळ प्रक्षेपणाचा खर्च खूप कमी होईल, असा अंदाज आहे. अशाच प्रकारे हैद्राबादचे आणखी एक स्टार्ट अप्स - ध्रुव स्पेस, सॅटेलाइट डिप्लॉयर आणि सॅटेलाइटच्या उच्च तांत्रिक सौर पॅनल्सवर कार्यरत आहे. आणखी एका अंतराळाशी संबंधित स्टार्ट-अप्स- ‘दिगंतरा’चे तन्वीर अहमद यांना मी भेटलो होतो.  ‘दिगंतरा’ व्दारे अंतराळ कक्षेतला कचरा चिहिृनीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आता  त्यांनी अंतराळामध्ये जमा होत असलेल्या    कच-याची विल्हेवाट कशी लावावी, यासाठी उपाय शोधण्याच्या तंत्रज्ञानावर काम करावे,  असे   आव्हानही मी  दिले आहे. ‘दिगंतरा’ आणि ‘ध्रुव स्पेस’  या दोन्हींचे  30 जून रोजी इस़्रोच्या प्रक्षेपण वाहनाने आपले पहिले प्रक्षेपण करण्यात येणार आहे. याचप्रमाणे, बंगलुरूच्या एका अंतराळ स्टार्ट अप्स - अस्ट्रेमच्या  स्थापनकर्त्या नेहा यांनी अतिशय कमालीच्या कल्पनेवर काम सुरू केले आहे. त्यासाठी त्यांना तुलनेनं खूपच कमी गुंतवणूक खर्च आला असेल. या तंत्रज्ञानाला संपूर्ण जगभरातून मागणी येवू शकते.

पंतप्रधान पुढे म्हणतात की,इन- स्पेस कार्यक्रमामध्ये मेहसाणा इथल्या शाळेतली कन्या तन्वी पटेल, हिलाही मी भेटलो. ती एका खूप छोट्या उपग्रहाशी संबंधित काम करीत आहे. आगामी काही महिन्यांमध्येच तिचा उपग्रह अंतराळामध्ये प्रक्षेपित होणार आहे. तन्वीने मला गुजरातीमधून अतिशय सहजतेने स्वतः केलेल्या कामाविषयी माहिती दिली. तन्वीप्रमाणे देशातले जवळपास साडेसातशे शालेय विद्यार्थी, अमृत महोत्सवामध्ये अशाच 75 उपगृहावर काम करीत आहेत, विशेष आनंदाची बातमी म्हणजे, यामध्ये बहुतांश विद्यार्थी देशातल्या लहान-लहान शहरांतले आहेत.

ज्यांच्या मनामध्ये काही वर्षांपूर्वी अंतराळ क्षेत्राची प्रतिमा  एखाद्या गुप्त मोहिमेसारखी होती, तेच हे युवक आज अंतराळ क्षेत्रामध्ये काम करीत आहेत. मात्र देशाने अंतराळ क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणल्या, आणि आता  युवकही  उपग्रह प्रक्षेपित  करण्‍याचे काम करीत आहेत. ज्यावेळी देशाचा युवक आकाशाला गवसणी घालण्यासाठी सिद्ध असतो, तर मग आपला देश या कामामध्ये मागे कसा काय राहू शकेल?

‘मन की बात’ मध्ये आता एका अशा विषयावर बोलणार आहे की, तो विषय ऐकून आपल्या सर्वांचे मन प्रफल्लित होईल आणि आपल्याला प्रेरणाही मिळेल. गेल्या काही दिवसांपूर्वी आपले ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोपडा पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. ऑलिपिंकनंतरही ते एकापाठोपाठ एक, यशाचे नव-नवीन विक्रम स्थापित करीत आहेत. इतकंच नाही, तर त्यांनी आपलाच ‘जॅव्हेलीन थ्रो’चा म्हणजेच भाला फेकीचा विक्रम मोडला आहे.  क्यओर्तने क्रीडा स्पर्धेमध्ये नीरज यांनी पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकून देशाची मान उंचावली आहे. क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी हवामान अतिशय प्रतिकूल असतानाही नीरज चोपडा यांनी हे सुवर्णपदक जिंकले. असे प्रचंड धैर्य दाखवणे, हीच आजच्या युवकाची खरी ओळख आहे. स्टार्ट-अप्सपासून ते क्रीडा जगतापर्यंत भारताचे युवक नव-नवीन विक्रम तयार करीत आहेत. अलिकडेच आयोजित केलेल्या ‘खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धे’तही आपल्या खेळाडूंनी अनेक नवीन विक्रम नोंदवले आहेत, या खेळांमध्ये एकूण नवीन  12 विक्रम नोंदवले गेले. इतकेच नाही तर, यापैकी 11 विक्रम महिला खेळाडूंच्या नाववर जमा झाले आहेत,  हे जाणून तुम्हा मंडळींना आनंद वाटेल.  मणीपूरच्या एम. मार्टिना देवी यांनी भारत्तोलनमध्ये आठ विक्रम  नोंदवले आहेत.

याचप्रमाणे संजना, सोनाक्षी आणि भावना यांनीही आपले वेगवेगळे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. आगामी काळामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पत- प्रतिष्ठा किती वाढणार आहे, हे या खेळाडूंनी आपल्या कठोर परिश्रमांनी दाखवून दिलं आहे. या सर्व क्रीडापटूंचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना भविष्यातल्या स्पर्धांसाठी शुभेच्छाही देतो. मित्रांनो, खेलो इंडिया युवा स्पर्धेची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, यावेळीही असे अनेक प्रतिभावान खेळाडू समोर आले की, त्यांनी आपल्या जीवनामध्ये खूप कठीण संघर्ष केला आणि यशोशिखर गाठले. त्यांच्या यशामध्ये, त्यांचे कुटुंबिय, आणि त्यांच्या माता-पित्यांचीही मोठी भूमिका आहे.

पंतप्रधान म्हणाले, 70 किलोमीटर सायकलिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक  जिंकणारा, श्रीनगरचा आदिल अल्ताफ याचे पिता टेलरिंगचे काम करतात. मात्र त्यांनी आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही. आज आदिलने आपल्या पित्याची मान उंचावली आहे आणि संपूर्ण जम्मू-काश्मिरसाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. वेट लिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा चेन्नईचा एल. धनुषचे वडीलही साधे   सुतारकाम करतात. सांगलीची कन्या काजोल सरगारचे वडील चहा विक्रीचे काम करतात. काजोल आपल्या वडिलांच्या कामात मदतही करते आणि ती वेटलिफ्टिंगचा सरावही करीत होती. तिने  आणि तिच्या कुटुंबाने घेतलेले परिश्रम कारणी लागले आणि काजोलनं  सर्वांकडून शाबासकी मिळवली.  अगदी याचप्रमाणे नवलपूर्ण काम रोहतकच्या तनूने केलं  आहे. तनूचे वडील राजबीर सिंह रोहतकमध्ये एका शाळेच्या बसचे चालक आहेत. तनूने कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकून आपलं  आणि आपल्या कुटुंबाचं , आपल्या वडिलांचं स्वप्न सत्यामध्ये आणून दाखवलं .

मित्रांनो, क्रीडा जगतामध्ये आता भारतीय क्रीडापटूंचा दबदबा वाढतोय, त्याचबरोबर भारतीय क्रीडा प्रकारांनाही नवीन ओळख मिळत आहे. यंदा खेलो इंडिया युवा स्पर्धांमध्ये ऑलिपिंकमध्ये  होणा-या स्पर्धांशिवाय पाच स्वदेशी क्रीडांच्या स्पर्धांचाही समावेश केला होता. हे पाच खेळ आहेत - गतका, थांग ता, योगासन, कलरीपायट्टू आणि मल्लखांब.

भारतामध्ये अशा प्रकारची  क्रीडास्पर्धा भरविण्यात येणार आहे की, ज्या खेळाचा जन्म अनेक युगांपूर्वी आपल्याच देशामध्ये झाला होता.  या स्पर्धेचे आयोजन 28 जुलैपासून होत आहे. ही स्पर्धा आहे बुद्धिबळ ऑलिंपियाड! खेळ आणि तंदुरूस्ती या विषयावरची आजची आपली ही चर्चा आणखी एक व्यक्तीचं  नाव घेतल्याशिवाय पूर्ण होवू शकणार नाही. हे नाव आहे- तेलंगणाच्या पर्वतारोही पूर्णा मालावथ ! पूर्णा यांनी ‘सेवेन समिटस् चॅलेंज’ पूर्ण करून विजयाचा ध्वज फडकवला आहे. सेवेन समिटस् चॅलेंज म्हणजे जगातल्या सर्वात अवघड आणि सर्वात उंच सात पर्वतांवर चढाई करण्याचे आव्हान पूर्ण करणे. पूर्णा यांनी आपल्या दुदर्म्य धाडसाने उत्तर अमेरिकेतल्या सर्वात उंच पर्वतावर - ‘माउंट देनाली’वर चढाई यशस्वी करून दाखवली आणि देशाचा अभिमान वाढवला आहे. पूर्णा, या  भारतकन्येने वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करण्याचा पराक्रम केला आहे.

आता खेळांचा विषय निघालाच आहे तर मी आज भारताच्या सर्वात प्रतिभावान क्रिकेट खेळाडूंपैकी एक असेलल्या, मिताली राज बद्दल काही बोलू इच्छितो. तिने याच महिन्यात क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आणि या बातमीने अनेक क्रीडारसिक भावूक झाले आहेत.मिताली केवळ एक अत्युत्कृष्ट खेळाडू नाहीये तर ती अनेक खेळाडूंसाठी प्रेरणेचा एक मोठा स्त्रोत देखील आहे. मी मितालीला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो.

आपण मन की बात या कार्यक्रमात अधूनमधून ‘कचऱ्यापासून समृद्धी’ मिळविण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांबद्दल चर्चा करत असतो.असेच एक उदाहरण आहे, मिझोरम राज्याची राजधानी आईजवालचे. आईजवाल या शहरात ‘चिटे लुई’ नावाची एक सुंदर नदी आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्यामुळे ही नदी घाण आणि कचऱ्याचा ढीग बनली होती. गेल्या काही वर्षांपासून या नदीला वाचविण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. तेथील स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक रहिवासी एकत्र येऊन ‘सेव्ह चिटे लुई’ म्हणजे चिटे लुईनदीला वाचवण्यासाठीच्या कृती योजनेनुसार काम करत आहेत. नदीचा प्रवाह स्वच्छ करण्यासाठीच्या या मोहिमेने कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्याचा मार्ग खुला करून दिला आहे. खरेतर, या नदीच्या पात्रात आणि दोन्ही किनाऱ्यांवर प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिक आणि पॉलिथिनचा इतर कचरा साठला होता. नदीचा प्रवाह मोकळा करणाऱ्या संस्थेने या पॉलिथिनचा वापर करून रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच नदीच्या पात्रातून काढण्यात आलेल्या कचऱ्यापासून मिझोरमच्या एका गावात, त्या राज्यातला सर्वात पहिला प्लॅस्टिकपासून निर्मित रस्ता तयार झाला. म्हणजेच स्वच्छता देखील झाली आणि विकास देखील झाला.

पुदुचेरीच्या युवकांनी त्यांच्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून असाच एक उपक्रम हाती घेतला आहे. पुदुचेरी हे शहर समुद्रकिनारी वसलेले आहे. तिथले देखणे किनारे आणि समुद्राचे देखावे पाहण्यासाठी फार मोठ्या संख्येने पर्यटक तिथे येतात.पुदुचेरीच्या समुद्र किनाऱ्यावर देखील प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे घाण वाढत चालली होती. आणि म्हणून आपला समुद्र, किनारे तसेच तिथली स्थानिक परिसंस्था वाचविण्यासाठी तिथल्या स्थानिक लोकांनी ‘रिसायक्लिंग फॉर लाईफ’ अभियान सुरु केले आहे. आज घडीला पुदुचेरीच्या कराईकल भागात रोज हजारो किलो संकलित केला जातो, त्याचे वर्गीकरण करण्यात येते. त्यातील जैविक कचऱ्याचा वापर खते निर्माण करण्यासाठी केला जातो. इतर गोष्टी वेगळ्या करून त्यांच्यावर पुनर्प्रक्रिया करण्यात येते. अशा प्रकारचे उपक्रम प्रेरणादायी तर आहेतच शिवाय ते भारताच्या ‘एकल वापराच्या प्लॅस्टिक’ विरुद्ध सुरु असलेल्या अभियानाला अधिक चालना देखील देतात.

आज मी जेव्हा तुमच्याशी बातचीत करतो आहे त्याचवेळेस हिमाचल प्रदेशात एक अत्यंत अनोखी सायकल रॅली देखील सुरु आहे.त्याबद्दल आज मी तुम्हांला अधिक माहिती देणार आहे. स्वच्छतेचा संदेश घेऊन सायकलस्वारांचा एक गट सिमल्याहून मंडीला जाण्यासाठी निघाला आहे. हे लोक डोंगराळ भागातील अवघड रस्त्यांवरून सुमारे पावणेदोनशे किलोमीटरचे हे अंतर सायकलवरून पार करणार आहेत. या गटात लहान मुले देखील आहेत तसेच वरिष्ठ नागरिक देखील आहेत.आपले पर्यावरण स्वच्छ असले, आपले डोंगर, नद्या, समुद्र स्वच्छ असले तर आपले आरोग्य देखील अधिक उत्तम राहते. तुम्ही देखील या दिशेने सुरु असलेल्या तुमच्या प्रयत्नांची माहिती लिहून मला नक्की कळवा.

पंतप्रधान पुढे म्हणतात की,आपल्या देशात सध्या मान्सून हळूहळू जोर धरत आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण वाढते आहे. ही वेळ, ‘जल’ आणि ‘जल संरक्षण’ यांच्या संदर्भात विशेष प्रयत्न करण्याची देखील आहे. आपल्या देशात तर सर्व समाजाने मिळून शतकानुशतके ही जबाबदारी पेलली आहे. तुमच्या लक्षात असेल, की आपण ‘मन की बात’ मध्ये एका भागात स्टेप वेल म्हणजे विहिरींच्या वारशाबाबत चर्चा केली होती. ज्या मोठ्या आकाराच्या विहिरींच्या पाण्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधून काढलेल्या असतात त्यांना बावडी असे म्हणतात. राजस्थानात उदयपुर येथे अशीच एक शेकडो वर्ष जुनी बावडी आहे – ‘सुलतान की बावडी’. राव सुलतान सिंह यांनी ती खोदून घेतली होती. मात्र, तिच्याकडेही दुर्लक्ष झाल्यामुळे तो परिसर हळूहळू निर्जन होत गेला आणि तिथे कचरा-घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. एके दिवशी काही तरुण फिरतफिरत या जागेपर्यंत पोहोचले आणि या विहिरीची दशा पाहून अत्यंत दुःखी झाले. त्या तरुणांनी त्याच क्षणी सुलतान की बावडीचे रूप आणि नशीब बदलण्याचा निर्धार केला. त्यांनी त्यांच्या या मोहिमेला नाव दिले- ‘सुलतान से सूर-तान’. तुम्ही विचार कराल की हे सूर-तान काय आहे? तर या युवकांनी त्यांच्या प्रयत्नांतून केवळ या विहिरीचा कायाकल्प घडवून आणला नाही तर त्यांनी या विहिरीला संगीताच्या सूर आणि तालांशी जोडले. ‘सुलतान की बावडी’च्या साफसफाईनंतर तिचे सुशोभीकरण केले गेले आणि तिथे सुरांचा आणि संगीताचा आनंद घेण्यासाठी कार्यक्रम सुरु करण्यात आला. या उपक्रमाला इतकी प्रसिद्धी मिळाली की आता परदेशातून देखील लोक हा कार्यक्रम पाहण्यासाठी आवर्जून येथे येतात. या यशस्वी अभियानाबाबतची एक विशेष गोष्ट अशी की या अभियानाची सुरुवात करणारे सर्व तरुण चार्टर्ड अकाउंटंट आहेत. योगायोगाने, येत्या काही दिवसांतच चार्टर्ड अकाउंटंट दिन येऊ घातला आहे. मी देशातील सर्व चार्टर्ड अकाउंटंट ना यानिमित्त आत्ताच शुभेच्छा देतो. आपण आपल्या जल-स्त्रोतांना अशाच प्रकारे संगीत आणि इतर सामाजिक कार्यक्रमांशी जोडून घेऊन त्यांच्या बाबत जागरूकतेची भावना निर्माण करू शकतो. जल संरक्षण हे खरेतर जीवनाचे संरक्षण आहे. आजकाल कितीतरी नद्यांचे महोत्सव आयोजित होऊ लागले आहेत हे तुम्ही पाहिले असेल. तुम्ही सर्वांनी आपापल्या शहरांमध्ये अशा प्रकारचे जे जल-स्त्रोत असतील त्यांच्या परिसरात कोणत्या ना कोणत्या उपक्रमाचे आयोजन अवश्य करा.

आपल्या उपनिषदांमध्ये एक जीवन मंत्र दिलेला आहे – चरैवेति-चरैवेति-चरैवेति. तुम्ही देखील हा मंत्र ऐकलेला असेल. त्याचा अर्थ आहे – चालत रहा- चालत रहा. हा मंत्र आपल्या देशात अत्यंत लोकप्रिय आहे कारण सतत चालत राहणे, गतिशील असणे हा आपल्या स्वभावाचा एक भाग आहे. एक देश म्हणून, आपण हजारो वर्षांची विकास यात्रा करून इथपर्यंत येऊन पोचलेलो आहोत. एक समाज म्हणून आपण नेहमीच नवे विचार, नवे बदल यांचा स्वीकार करून पुढे आलो आहोत. याच्या पाठीमागे आपली सांस्कृतिक गतिशीलता आणि तीर्थयात्रांचे फार मोठे योगदान आहे. आणि म्हणून तर आपल्या ऋषी-मुनींनी, तीर्थयात्रेसारख्या धार्मिक जबाबदाऱ्या आपल्यावर सोपविलेल्या आहेत.आपण सर्वजण वेगवेगळ्या तीर्थयात्रा करत असतो.यावर्षी चारधाम यात्रेमध्ये किती प्रचंड संख्येने भाविक सहभागी झाले ते तुम्ही सर्वांनी पाहिले असेलच.आपल्या देशात वेळोवेळी वेगवेगळ्या देवांच्या यात्रा देखील निघत असतात.देवांच्या यात्रा, म्हणजे केवळ भाविकच नव्हे तर आपले देव देखील यात्रेसाठी निघतात. आता काही दिवसांतच म्हणजे 1 जुलैपासून भगवान जगन्नाथांची यात्रा सुरु होणार आहे. ओदिशामधील पुरीच्या या यात्रेची माहिती तर प्रत्येक देशवासियाला आहे. या प्रसंगी पुरीला जाता यावे असे प्रत्येक भाविकाला वाटत असते. इतर राज्यांमध्ये देखील अत्यंत उत्साहाने जगन्नाथाची यात्रा काढण्यात येते. आषाढ महिन्यातील द्वितीयेपासून भगवान जगन्नाथांची यात्रा सुरु होते. आपल्या ग्रंथांमध्ये ‘आषाढस्य द्वितीय दिवसे....रथयात्रा’ अशा प्रकारचे संस्कृत श्लोक आपल्याला वाचायला मिळतात. गुजरातमध्ये अहमदाबाद शहरात देखील दर वर्षी आषाढ द्वितीयेपासून रथयात्रा सुरु होते. मी गुजरातेत असताना, मला देखील दर वर्षी या रथयात्रेत सहभागी होण्याचे भाग्य लाभत होते. आषाढ द्वितीया, जिला आषाढ बीज देखील म्हणतात त्याच दिवशी कच्छ समाजाचे नववर्ष देखील सुरु होते. मी माझ्या सर्व कच्छी बंधू-भगिनींना नववर्षाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. माझ्यासाठी ती तिथी अजून एका कारणासाठी विशेष महत्त्वाची आहे, मला आठवतंय, आषाढ द्वितीयेच्या एक दिवस आधी म्हणजे आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी आम्ही गुजरातमध्ये एका संस्कृत उत्सवाची सुरुवात केली होती. या उत्सवात संस्कृत भाषेतील गीत-संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाचे नाव आहे ‘आषाढस्य प्रथम दिवसे.’ या उत्सवाला हे विशिष्ट नाव देण्याचे देखील खास कारण आहे. खरेतर, संस्कृतभाषेतील महान कवी कालिदास यांनी आषाढ महिन्यापासून वर्ष ऋतूच्या आगमन प्रसंगी मेघदूत नावाचे महाकाव्य लिहिले होते. मेघदूतात एक श्लोक आहे – आषाढस्य प्रथम दिवसे, मेघम् आश्लिष्ट सानुम् म्हणजे आषाढ मासाच्या पहिल्या दिवशी पर्वत शिखरांना वेधून बसलेल्या मेघा, आणि हाच श्लोक या उत्सवाच्या आयोजनाचा आधार झाला होता.

अहमदाबाद असो वा पुरी, भगवान जगन्नाथ त्यांच्या या यात्रेच्या माध्यमातून आपल्याला अनेक सखोल मानवी शिकवण देत असतात.भगवान जगन्नाथ जगाचे स्वामी तर आहेतच, पण त्यांच्या या यात्रेत गरीब आणि वंचित समुदायांचा विशेष सहभाग असतो. प्रत्यक्ष भगवान देखील समाजाच्या प्रत्येक घटकासोबत आणि प्रत्येक व्यक्तीसोबत चालतात. अशाच प्रकारे आपल्या देशात ज्या विविध प्रकारच्या यात्रा होतात त्यांच्यामध्ये गरीब-श्रीमंत, उच्च-नीच असा कोणताही भेदभाव बघायला मिळत नाही. या सर्व भेद्भावांपेक्षा अधिक उच्च पातळी गाठून यात्राच सर्वात महत्त्वाची ठरते. उदाहरण सांगायचे तर, महाराष्ट्रातल्या पंढरपूरच्या यात्रेबद्दल तुम्ही सर्वांनी नक्कीच ऐकले असेल. पंढरपूरच्या यात्रेत कोणी मोठा नसतो आणि कोणी लहान नसतो. यात्रेतला प्रत्येक जण वारकरी असतो, विठ्ठलाचा भक्त असतो. आता चारच दिवसांनी अमरनाथ यात्रा देखील सुरु होते आहे.संपूर्ण देशभरातील श्रद्धाळू भाविक, अमरनाथ यात्रेसाठी जम्मू-काश्मीरला पोहोचतात. जम्मू-काश्मीरची स्थानिक जनतादेखील तेवढ्याच उत्साहाने या तीर्थयात्रेची जबाबदारी पार पाडते आणि यात्रेकरूंची सर्व प्रकारे मदत करते.

पंतप्रधान म्हणतात की, दक्षिण भारतात, शबरीमाला यात्रेला देखील असेच विशेष महत्त्व आहे. शबरीमालेच्या डोंगरावर असलेल्या भगवान अय्यप्पा यांचे दर्शन घेण्यासाठी तिथे पोहोचण्याचा मार्ग संपूर्णपणे घनदाट जंगलांनी वेढलेला होता त्या काळापासून ही यात्रा सुरु आहे. आजच्या काळात देखील जेव्हा लोक या यात्रेसाठी तिथे जातात तेव्हा त्यांच्या धार्मिक विधींपासून, त्यांच्या राहण्या-खाण्याची सोय करण्यापर्यंत, तेथील गरिबांना उपजीविकेच्या कितीतरी संधी निर्माण होतात. म्हणजेच, या तीर्थयात्रा प्रत्यक्षात आपल्याला गरिबांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देतात आणि गरिबांसाठी देखील त्या तितक्याच हितकारक ठरतात. म्हणूनच आज देश देखील आता या अध्यात्मिक यात्रांच्या आयोजनात, भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी इतके प्रयत्न करत आहे. तुम्ही देखील अशा एखाद्या यात्रेला जाल तेव्हा तुम्हांला अध्यात्मासोबत, एक भारत-श्रेष्ठ भारत याचे देखील दर्शन होईल.

पंतप्रधान देशवासीयांना म्हणतात की,नेहमीप्रमाणेच या वेळी देखील ‘मन की बात’च्या माध्यमातून तुम्हां सर्वांशी जोडले जाण्याचा हा अनुभव अत्यंत सुखद होता.आपण देशवासीयांची यशस्वी कामगिरी आणि प्रगतीची चर्चा केली. या सर्वांसोबतच आपल्याला कोरोनाविरुध्द सावधगिरी बाळगण्याची देखील काळजी घ्यायची आहे. अर्थात, आपल्या देशाकडे कोरोनाप्रतिबंधक लसीचे संरक्षक कवच आहे ही सर्वात समाधानकारक गोष्ट आहे. आपण देशवासियांना या लसीच्या 200 कोटी मात्रा देण्याच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचतो आहोत. देशात सावधगिरीची मात्रा देण्याचे काम देखील वेगात सुरु आहे. जर लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर आता तुमच्या सावधगिरीच्या मात्रेची वेळ झाली असेल तर तुम्ही ही तिसरी मात्रा अवश्य घेतली पाहिजे. तुमच्या कुटुंबातील सर्वांना, विशेषतः वृद्धांना ही सावधगिरीची मात्रा अवश्य द्या. आपल्याला वेळोवेळी हात स्वच्छ करणे तसेच मास्कचा योग्य वापर करणे या गोष्टी देखील पाळल्या पाहिजेत. त्याचबरोबर, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आजूबाजूला पसरलेल्या घाणीमुळे जे रोग होऊ शकतात त्यापासून देखील आपल्याला सावध राहणे आवश्यक आहे. तुम्ही सर्वांनी सजग असा, निरोगी व रहा आणि अशाच उत्साहाने पुढे जात रहा.  पुढच्या महिन्यात आपण पुन्हा एकदा भेटूच, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद, नमस्कार!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.