मलिग्रेत भावेश्वरी दूध संस्थेचे मोठ्या उत्साहात उदघाटन
आजरा (हसन तकीलदार): मलिग्रे (ता.आजरा) येथे श्री भावेश्वरी सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे थाटात उदघाट्न समारंभ पार पडला. सत्ता आल्यानंतर काटकसरीचा कारभार केल्याने गोकुळची प्रगती सुरू आहे. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती अजून वाढली पाहिजे. त्यामुळे दूध धंद्याकडे जोडधंदा म्हणून न करता प्रमुख धंदा म्हणून काम केल्यास शेतकऱ्यांचे भवितव्य उज्वल असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतेज पाटील यांनी केले.
मलिग्रे (ता आजरा) येथे श्री भावेश्वरी सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे उद्घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर अध्यक्षस्थानी होत्या. आजरा कारखाना अध्यक्ष मुकुंददादा देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीतिमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
आमदार पाटील पुढे म्हणाले, दुधामुळे जिल्ह्याची आर्थिक उन्नती झाली. गोकुळ आणि जिल्हा बँक टिकल्या पाहिजे. या संस्था जिल्ह्याचे हृदय आहेत. आम्ही या दोन्ही संस्था आई वडीलासारख्या जोपासत आहोत. आम्ही सत्तेत आल्यानंतर १५००कोटी रूपये वाढवले. ८ लाखावरून १८ लाख लिटर दूध संकलन झाले. एक रूपयातील ८६ पैसे शेतकऱ्यांना देतो. १४ पैशात प्रशासकीय व्यवहार केले. ७० लाख रुपये वीज बिलाची बचत केली.
संचालिका अंजनाताई रेडेकर म्हणाल्या, पाडव्याला २१ लाख लिटर संकलन झाले. गोकुळ प्रगतीपथावर असून दूध संस्थांनी नवीन उत्पादक शेतकरी तयार करावेत. व्यावसाय म्हणून दूध धंदा तरूणांनी करावा. यावेळी माजी सरपंच दत्ता परीट, काँ. संजय तर्डेकर, रामराजे कुपेकर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष उमेश आपटे,माजी सभापती मसणू सुतार, विद्याधर गुरबे, दिग्विजय कुराडे, रमेश रेडेकर, संजय सावंत,विकास बागडी, रामदास पाटील आदीजण उपस्थित होते. कारखाना संचालक अशोक तर्डेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना दूध संस्थेविषयी माहिती दिली. संजय घाटगे यांनी आभार मानले.