दोन युवकांनी पुढाकार घेत तीन एकरमध्ये बनविले मोठे क्रीडांगण
आजरा तालुक्यातील कोरीवडे येथील संतोष पाटील आणि दत्ता पाटील या युवकांचा विधायक उपक्रम
आजरा (हसन तकीलदार): कोरीवडे (ता. आजरा) येथील युवा सामाजिक व राजकीय नेते संतोष पाटील आणि दत्ता पाटील यांनी गावातील युवकांची साथ घेत तीन एकरमध्ये मोठे क्रीडांगणासाठी मैदान बनवले. मनात घेतलं तर सर्व काही होऊ शकतं हे या युवकांनी दाखवून दिले आहे.
कोरीवडे येथे शाळेच्या तसेच गावच्या युवकांना व मुलांना खेळण्यासाठी कोठेही मैदान उपलब्ध नव्हते. गावातील मुलांना क्रिकेट किंवा इतर खेळ खेळण्यासाठी गावात मैदान नसल्यामुळे क्रिकेट खेळण्यासाठी दुसऱ्या गावात जावे लागत होते. त्याचप्रमाणे प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांना कबड्डी, खोखो, हॉलिबॉल इतर खेळ खेळायला अडचणी निर्माण होत होत्या. विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेत भाग घेताना समस्या तयार होत होत्या. खेळांचा सराव करणे अवघड झाले होते. गावातील वयोवृद्ध महिला, पुरुष यांना सकाळ संध्याकाळ फिरायला रस्त्यावर जावे लागत होते. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. जीव मुठीत घेऊन या वृद्धाना फिरायला जावे लागत होते. या सर्व अडचणी लक्षात घेऊन गावातील युवा सामाजिक नेते संतोष पाटील आणि दत्ता पाटील यांनी पुढाकार घेत गावातील युवकांना साद देत ट्रॅक्टरच्या सहाय्याने तीन एकरच्या भागातील झुडपे, काटेरी वनस्पती आणि खड्डे काढून सपाटीकरण करीत साफ सफाई करण्यात आली. हे विधायक कार्य त्यांनी स्वतः केले आहे.
यावेळी संतोष पाटील म्हणाले, राजकारणातून समाजकारण करता येते. राजकीय सानिध्यातून समाजहीत साधता येते. लोकांची आणि विद्यार्थ्यांची होणारी अडचण लक्षात आल्यानंतर आम्हाला एक मैदान करावेसे वाटले आणि गावातील युवकांच्या सहकार्याने या कामाला सुरुवात करण्यात आली. सर्व युवा वर्गाला एकत्र करून सर्वांच्या सहभागातून मैदान बनवण्याचा निर्णय घेतला गेला. आता खेळण्यासाठी, फिरण्यासाठी तसेच पोलीस, सैन्य दलात भरती होणाऱ्या युवकांच्या धावण्यासाठी हे मैदान सज्ज झाले आहे. अशाच प्रकारची विधायक आणि विकासात्मक कामे गावासाठी करत रहाणार असे त्यांनी सांगितले. यावेळी गावातील सर्व तरुण उपस्थित होते.
व्हिडिओ येथे पहा 👇👇