काळू मास्तर विद्यालय उपविजेता; सनी त्रिवेदी स्पर्धावीर
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथे चुरशीच्या झालेल्या अंतिम फुटबॉल सामन्यात शिवराज इंग्लीश मिडियम स्कूलने काळू मास्तर विद्यालयाचा टायब्रेकरवर ४-३ असे नमवून विजेतेपदासह टिसीजी युनायटेड करंडक पटकाविला. शिवराजचा सनी त्रिवेदीने स्पर्धा वीरचा बहुमान पटकावला. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि टँलेन्ट कन्सोल ग्लोबल फौंडेशन ( टिसीजी) मार्फत गेले तीन आठवडे ही 'ब्लू कब फुटबॉल लीग' सुरू होती. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेचे यंदाचे सातवे वर्ष होते.
शिवराज आणि काळू मास्तर विद्यालयाच्या खेळाडूंनी आक्रमक सुरवात केल्याने चेंडू दोन्ही गोलक्षेत्रात फिरत राहिला. शिवराजचा सनी त्रिवेदी तर काळू मास्तरचा आयान पटेलचे गोलचे प्रयत्न लक्षवेधी होते. शिवराजचा गोलरक्षक समर्थ शेटके तर काळू मास्तरचा मनिष सावरतकर यांनी उत्कृष्ट गोलरक्षण करून गोलजाळी अभेद्य ठेवल्याने निर्धारित वेळेत सामना ०-० असा बरोबरीत सुटला. टायब्रेकरमध्ये शिवराजच्या रणवीर कुराडे, समर्थ शेटके, सनी त्रिवेदी, प्रतिक कांबळे यांनी तर काळू मास्तरच्या आय़ान पटेल, प्रेम कांबळे, मुर्तजा अली यांनाच गोल नोंदविता आले. गोलरक्षक शेटकेने पेनल्टीचा फटका अडवून संघाचा ४-३ असा विजय साकारला.
टीसीजी फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. प्रमोद इंचनाळकर, सचिव संजय पाटील, प्रसाद गवळी यांच्याहस्ते व ज्येष्ठ खेळाडू महादेव पाटील अध्यक्षते खाली विजेत्यांचा करंडक आणि सर्व खेळाडूंना किट देऊन गौरविण्यात आले. ललित शिंदे यांनी स्वागत तर प्रशिक्षक दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी समन्वयक दत्ता चव्हाण, युनायटेडचे संचालक संभाजी शिवारे, तानाजी देवेकर, ए. बी. पाटील, विष्णू कुराडे यांच्यासह पालक, खेळाडू उपस्थित होते. सागर पोवार, सुरज हनिमनाळे, श्रवण पाटील, अनिकेत कोले यांनी पंच म्हणून काम पाहिले.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सनी त्रिवेदी ( शिवराज), मनिष सावरतकर, विरेंद्र कांबळे ( काळू मास्तर), रणवीर कुराडे, साईराज सासने ( शिवराज ) यांचा सन्मान करण्यात आला.