Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूर जिल्ह्यात 6 हजार 556 विद्यार्थी देणार NEET-UG 2025 परीक्षा ; एकूण 13 केंद्र

परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्याबाबत योग्य ते नियोजन करा :  जिल्हाधिकारी अमोल येडगे




कोल्हापूर :  देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्वाची असणारी प्रवेश परीक्षा म्हणजेच NEET-UG 2025 देशभरात दिनांक 4 मे 2025 रोजी होणार असून ही परीक्षा पारदर्शकपणे तसेच परीक्षार्थीची कोणतीही गैरसोय न होता पार पाडण्याबाबत योग्य ते नियोजन व अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.


NEET-UG 2025 परीक्षेच्या यशस्वी आयोजनाकरीता कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली DLCC ची (जिल्हास्तरीय समन्वय समिती) जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, समन्वय अधिकारी सैपन नदाफ, पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे, NTA तर्फे नियुक्त शहर समन्वयक (City Coordinator) युवराज ढोबळे, सहायक शहर समन्वयक (Ass. City Coordinator) प्रमोद कोळी, सहा. समन्वय अधिकारी नितीन वापसे पाटील, कॅनरा बँकेचे वरीष्ठ व्यवस्थापक समाधान घोंगाणे, एसबीआय बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र साबळे, जिल्हाधिकारी यांच्यातर्फे नियुक्त 13 परीक्षा कार्यकारी दंडाधिकारी (नायब तहसिलदार) इत्यादी अधिकारी उपस्थित होते.


 कोल्हापूर जिल्ह्यातील 13 परीक्षा केंद्रावर एकूण 6 हजार 556 विद्यार्थी NEET-UG-2025 परीक्षा देणार असून, याकरीता जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. याकरीता प्रत्येक परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकरीता प्रतिकेंद्र 1 असे 13 परीक्षा कार्यकारी दंडाधिकारी (नायब तहसिलदार) त्यांनी नेमणूक केली आहे. तसेच पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांना परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे दृष्टीने पोलीस विभागाचे पोलीस उपअधीक्षक दर्जाचे 1 पोलीस नोडल अधिकारी, पोलीस निरीक्षक दर्जाचे 1 सहा. पोलीस नोडल अधिकारी व सर्व 13 परीक्षा केंद्रासाठी प्रत्येकी 1 एपीआय/ पीएसआय दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्याबाबत निर्देश दिले आहेत. तसेच ज्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थी संख्या 480 असेल तेथे 6 पोलीस कर्मचारी, विद्यार्थी संख्या 480 ते 600 दरम्यान असल्यास 8 पोलीस कर्मचारी व 600 पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या केंद्राकरीता 9 पोलीस कर्मचारी Frisking कामकाजाकरीता नियुक्त करण्यात येणार आहेत. परीक्षेचे साहित्य असणाऱ्या पेट्या GPS प्रणालीव्दारे NTA मध्यवर्ती केंद्राशी जोडलेली असणार आहेत. याव्दारे या परीक्षा साहित्याच्या हालचालीवर देखरेख राहणार आहे. या वाहनांना सशत्र पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर प्रवेशाकरीता व बाहेर जाण्याकरीता केवळ एकच प्रवेशव्दार असणार असून, परीक्षेकरीता नियुक्त अधिकारी, कर्मचारी, पोलीस व प्रशासकीय अधिकारी यांना ओळखपत्र व नियुक्ती आदेशाची प्रत बाळगणे बंधनकारक आहे.


परीक्षा केंद्रावर प्रवेश करताना DFMD (Digital Frame Metal Detector) यंत्रामधूनच परीक्षार्थीना प्रवेश देण्यात येणार असून परीक्षार्थीना परीक्षा केंद्रावर कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य आणण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षा कालावधीत मोबाईल जॅमर लावणेत येणार आहेत. मोबाईल, कॅल्क्यूलेटर, पेन ड्राईव्ह. हेडफोन, स्मार्टवॉच इत्यादी वस्तू केंद्रावर आणता येणार नाहीत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पुरेशा प्रमाणात CCTV कॅमेरे बसविण्यात आले असून, याव्दारे परीक्षा कालावधी दरम्यान कोणताही गैरप्रकार रोखण्यास मदत मिळणार आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रत्येक केंद्रावर करण्यात येणार असून परीक्षार्थीनी परीक्षा केंद्रावर येताना प्रवेशपत्रावरील सूचना काळजीपूर्वक वाचून अनावश्यक साहित्य सोबत आणू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.

 

दिनांक 4 मे 2025 रोजी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सकाळी 11 वाजता परीक्षार्थीना प्रवेश देण्यास सुरवात होईल. याकरीता प्रत्येक केंद्रावर विद्यार्थाच्ये Time Slot पाडण्यात आले असून यामुळे अनावश्यक घाई गडबड होणार नाही. दुपारी 1:30 वाजता परीक्षार्थीना प्रवेश बंद करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील दुर्गम व लांबच्या भागातून येणाऱ्या विद्यार्थी यांनी याबाबत वेळेत पोहचण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे. परीक्षेचा कालावधी दुपारी 2 ते 5 असून दिव्यांग विद्यार्थी यांना 1 तास (सायंकाळी 6 वाजेपर्यंत) अतिरीक्त मिळेल. प्रत्येक परीक्षा केंद्राबाहेर 100 मिटर परीघात कोणतेही वाहन किंवा व्यक्ती यांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षेच्या एक दिवस अगोदर सर्व वर्ग खोल्यांमधील आसन व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, फॅन, पेयजल, स्वच्छतागृह, CCTV कॅमेरे, बैठक व्यवस्था, केंद्राबाहेरील पार्कीग इत्यादी सर्व व्यवस्था तपासून त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश परीक्षा कार्यकारी दंडाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. परीक्षेकरीता नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत तसेच कर्तव्यात कोणत्याही प्रकारची हयगय केल्यास तात्काळ कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थितांना दिला.


अशाप्रकारे NEET-UG-2025 परीक्षेच्या यशस्वी आयोजनाकरीता जिल्हा प्रशासनातर्फे योग्य ती पुर्वतयारी करण्यात आली असून जिल्हा प्रशासनातर्फे परीक्षार्थीना परीक्षेकरीता शुभेच्छा देऊन बैठक समाप्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.