Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

1445.97 कोटी रुपयांचा श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा व 259.59 कोटी रुपयांच्या श्री जोतिबा मंदिर विकास आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन आणि विकासाला गती मिळणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर




कोल्हापूर : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निर्माणाच्या कार्याला अभिवादन म्हणून राज्यातील विविध मंदिर विकास आराखड्यांना एकूण 5503.69 कोटी रुपयांची राज्यस्तरीय मंजुरी देण्यात आली आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथे आज पार पडली.




या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर व श्री जोतिबा मंदिर परिसर विकास आराखड्यांना अनुक्रमे 1445.97 कोटी व 259.59 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली.




या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री व सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ, तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा (अपर मुख्य सचिव - नियोजन विभाग) उपस्थित होते.


या मंजुरीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दोन्ही आराखड्यांसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ते म्हणाले, ‘या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन व विकास कार्याला गती मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने दोन्ही मंदिरांसाठी सखोल अभ्यास करून आवश्यक व प्राधान्य कामांचा समावेश करत उपयुक्त आराखडा तयार केला आहे. हे सर्व राज्यातील भाविकांसाठी आनंददायक ठरणार आहे.’ 


श्री. प्रकाश आबिटकर यांनी पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्ह्यातील महत्वाच्या प्रलंबित विषयांत विशेष लक्ष घालून प्रयत्न सुरू केले आहेत. विकास आराखड्या बाबतही त्यांनी आराखडा तयार करण्या पासून मंजुरी पर्यंत प्रत्येक टप्प्यावर विशेष लक्ष दिल्याने आज श्री. अंबाबाई विकास आराखडा व श्री. क्षेत्र जोतिबा परिसर विकास आराखडय़ास मंत्री मंडळाची मान्यता मिळाली आहे.




श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर विकास आराखड्यात:👇


 • मंदिराचे दुरुस्ती व संवर्धन

 • किरणोत्सव मार्गातील अडथळे व अतिक्रमणांचे निर्मूलन

 • मंदिर परिसरातील दुकान गाळ्यांचे व्यवस्थापन

 • दर्शनासाठी अच्छादित मंडप

 • स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा

 • लॉकर्स, शू स्टँड

 • भवानी मंडप परिसराचा ‘हेरिटेज प्लाझा’ म्हणून विकास या कामांचा समावेश आहे. 



श्री जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्यात:👇


 • श्री क्षेत्र जोतिबा व यमाई मंदिराचे संवर्धन

 • पायवाटांचे जतन

 • कर्पूरेश्वर, चव्हाण व मुरलीधर तलावांचे संवर्धन

 • भाविकांसाठी वाहनतळ, सुविधा केंद्र

 • अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताद्वारे ज्योतस्तंभ निर्मिती

 • घनकचरा व सांडपाणी प्रकल्प

 • केदार विजय गार्डन व नवतळे परिसराचे सुशोभीकरण

 • यमाई मंदिर चाफेवन परिसर विकास या कामांचा समावेश आहे. 


या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्यातून जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर व रोहित तोंदले, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, उपअभियंता सुयश पाटील तसेच संबंधित कन्सल्टंट व आर्किटेक्ट संतोष रामाणे व अभिनंदन मगदूम उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.