शिवराज- युनायटेड चषक : अर्ध्या लाखांची बक्षिसे
कुमार, युवा खेळाडूंना मिळणार संधी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विदया संकुलातर्फे शुक्रवारपासून (ता. ६) डेव्हलपमेंन्ट फुटबॉल लीगला प्रारंभ होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत १५, १७, १९ आणि एकवीस वर्षाखालील खेळाडूंचे सहा संघ सहभागी आहेत. स्पर्धेसाठी एकूण अर्ध्या लाखांची पारितोषिके आहेत. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणा-या शिवराज- युनायटेड डेव्हलपमेंन्ट फुटबॉल लीगचे हे बारावे वर्ष आहे.
चांगले खेळाडू घडण्यासाठी कुमार आणि युवा खेळाडूंना अधिक सामने खेळण्याची संधी देण्याची सुचना जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) केली आहे. या धर्तीवर स्थानिकसह परगावच्या प्रतिभावान १५, १७, १९ आणि २१ वर्षाखालील खेळाडूंचा समावेश असणाऱ्या सहा संघात साखळी पध्दतीने ही स्पर्धा होईल. तरी नवोदित खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन युनायटेडचे अध्य़क्ष डॉ. रविंद्र हत्तरकी, उपाध्यक्ष सुरेश कोळकी, शिवराजचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव प्रा. डॉ. अनिल कुराडे यांनी केले आहे. पाच दिवस साखळी- बाद पध्दतीने सायंकाळच्या सत्रात रोज दोन सामने होतील.
मंगळवारी (ता. ३) सायंकाळी सात वाजता खेळाडूंच्या बोलीचा कार्यक्रम होईल. गुरुवारी सायंकाळी सर्व खेळाडूंची वाहतूक शिस्तीच्या प्रबोधनासाठी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली निघेल. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता उदघाटनाचा सामना होईल. स्पर्धेतील विजेत्याला रोख पंधरा, उपविजेत्याला अकरा, तिसऱ्या क्रमांकाला सात आणि चौथ्याला पाच हजारांचे पारितोषिक आहे. प्रत्येक सामन्यातील विजयी संघातील उत्कृष्ट खेळाडूस सामनावीर तर पराभूत संघातील चांगला खेळ करणा-यास लढवय्या म्हणून क्रीडासाहित्य देऊन गौरविण्यात येईल. समन्वयक प्रसन्न प्रसादी, सुरज कोंडूस्कर हे स्पर्धेचे नियोजन करीत आहेत.
उद्यापासून निवड चाचणी
डेव्हलपमेंन्ट फुटबॉल लीग खेळाडू निवडण्यासाठी उद्या (ता. १) पासून मंगळवार अखेर निवड चाचणी होणार आहे. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर रोज सकाळी ६.३० ते ८ आणि सायंकाळी ५ ते ६.३० पर्यंत हि चाचणी होईल. यातून स्पर्धेसाठी ९० खेळाडूंची निवड होईल.