भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैश्णव यांच्याकडे मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी):बहुप्रतिक्षित रखडलेला कोल्हापूर -वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करून पश्चिम महाराष्ट्र कोकण रेल्वेला जोडावा अशी मागणी भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैश्णव यांच्याकडे केली आहे.
रेल्वेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र कोकणाला जोडला तर पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात मोठी क्रांती होऊ शकते. कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस पर्यंत रेल्वे मार्ग पूर्ण असून तेथून पुढे, मुंबई, बेंगलोर, हैद्राबाद अशा मोठ्या शहरांबरोबर कनेक्टिव्हिटी आहे.पण कोकणाशी कनेक्टिव्हिटी नाही. पश्चिम महाराष्ट्राला समुद्र किनारा नाही.त्यामुळे ह्या साखर पटृट्यातील साखर निर्यात करण्यासाठी मुंबई बंदर गाठावे लागते.हे गैरसोयीचे आणि खर्चिक आहे. कोकणाला मात्र 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे.त्यावर अनेक लहान मोठी बंदरे आहेत.तेथील जवळच्या बंदरातून आंतरराष्ट्रीय बाजारात कृषी उत्पादने आणि साखर निर्यात करणे सोयीचे होईल.शिक्षण ,व्यापार आणि पर्यटन ह्यांनाही चालना मिळेल.
कोल्हापूर -वैभववाडी रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाले असून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारने यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली होती.पण नंतर हे काम रखडले. तेंव्हा बहुप्रतिक्षित रखडलेला कोल्हापूर -वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करून पश्चिम महाराष्ट्र कोकण रेल्वेला जोडावा अशी श्री सावंत यांनी मागणी केली आहे.