गडहिंग्लजमध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी चाललेला खेळ
एम. आर. हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक संजय कुंभार यांची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थी-पालक रस्त्यावर
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील एम. आर. हायस्कूलचे विद्यार्थीप्रिय शिक्षक व प्रभारी मुख्याध्यापक संजय कुंभार यांची बदली झाल्याने विद्यार्थी व पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे. त्यांची बदली रद्द करावी या मागणीसाठी हे सर्वजण रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. याबाबतचे निवेदन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांना देत याकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. कुंभार सरांच्या बदलीची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अक्षरशा अश्रू आले. पालक वर्गातून देखील संताप व्यक्त करण्यात आला. जोपर्यंत कुंभार सरांची बदली रद्द होत नाही तोपर्यंत वर्गात देखील न बसण्याचा चंग विद्यार्थ्यांनी बांधला आहे. त्यामुळे शासन या विद्यार्थ्यांच्या भावना समजावून घेऊन कुंभार सरांची बदली रद्द करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे १०० वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभलेली एम.आर. हायस्कूल आज अस्तित्वाच्या उंबरठ्यावर उभी आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ५वी ते १०वीच्या वर्गांत केवळ २-३ विद्यार्थी असलेल्या या शाळेचे रूपांतर आज ३०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या विश्वासाच्या मंदिरात झाले आहे, तेही केवळ एकाच व्यक्तीमुळे ते म्हणजे प्रभारी मुख्याध्यापक संजय कुंभार यांच्यामुळे.
प्रभारी मुख्याध्यापक कुंभार सरांनी केवळ अध्यापन नव्हे, तर संपूर्ण शाळेच्या पुनरुज्जीवनाची जबाबदारी घेतली. त्यांनी स्वतःच्या पगारातून अत्याधुनिक क्लासरूम उभारल्या, लोकसहभागातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आणि एम.आर. हायस्कूल गडहिंग्लजमधील सामान्य विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार, मोफत शिक्षणाचे एकमेव आशास्थान बनवले. पण दुर्दैव असे की, जिथे शिक्षणाचा प्रकाश पसरतोय, तिथेच काही शक्ती अंधार निर्माण करण्यासाठी धडपड करत आहेत. या शाळेची झपाट्याने होत असलेली प्रगती पाहून काही लोक तिचे अस्तित्वच संपवण्याच्या प्रयत्नात आहेत आणि दु:खाची गोष्ट म्हणजे शासनही अशा प्रयत्नांना अप्रत्यक्ष साथ देत आहे अशी प्रतिक्रिया पालक वर्गातून व्यक्त होत आहे.
कुंभार सरांच्या बदलीची बातमी आली आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. शेकडो विद्यार्थी, पालक, शिक्षक शाळेसमोर जमले. घोषणाबाजी झाली. अनेक अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना फोन करण्यात आले. निवेदने देण्यात आली. शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांनी आपली वेदना सांगितली. उत्तर मात्र एकच: “प्रयत्न करू. बदली ही कायदेशीर प्रक्रिया आहे.”पण प्रश्न हा आहे कायदा कोणासाठी? चांगले कार्य करणाऱ्यांना दूर करण्यासाठी? गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळांना बंद करण्यासाठी? असा प्रश्न पालकातून विचारला जात आहे.
शासन म्हणते निधी अपुरा आहे. पण कुंभार सरांनी स्वतःच्या पगारातून स्मार्ट क्लासरूम उभे केलंय. विद्यार्थ्यांना लाखो रुपये देऊन खाजगी अकॅडमीला पाठवणं शक्य नाही. त्यामुळे एम.आर. हायस्कूल हेच त्यांच्या भवितव्याचे केंद्र आहे. कुंभार सर विद्यार्थ्यांसाठी गुरुच नाहीत, ते एक दैवत आहेत. शाळा बंद करणे, कुंभार सरांची बदली करणे, हे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर गदा आणणारे निर्णय ठरणार आहेत. आणि ही केवळ एका शिक्षकाची गोष्ट नाही तर ही गुणवत्तेची, समर्पणाची आणि ग्रामीण शिक्षणाच्या अस्तित्वाची लढाई आहे. कायद्याचे पालन करताना माणुसकीची किनार आवश्यक आहे असा सूर पालकांचा आहे.
गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे जिल्हा परिषद सीईओना निवेदन
एम. आर. प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक संजय कुंभार यांची बदली रद्द करावी अशी मागणी गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन यांच्यावतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज येथील जिल्हा परिषदेच्या महाराणी राधाबाई हायस्कूल ( एम. आर. ) प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक संजय कुंभार गेले दशकभरापासून कार्यरत आहेत. शतकमहोत्सवी या प्रशालेच्या गतवैभवासाठी त्यांनी माजी विद्यार्थी आणि विविध संस्थाच्या माध्यमातून प्रयत्नामुळे हायस्कूलचा पट वाढविला आहे. विविध उपक्रमातून त्यांनी प्रशालेची नवी ओळख निर्माण केली आहे. अशावेळी त्यांची प्रशासकिय बदली प्रशालेच्या विकासात अडसर ठऱणारी आहे. त्यामुळे खास बाब म्हणून त्यांची बदली रद्द करावी.
खासगी शाळांच्या स्पर्धेमुळे एम. आर. हायस्कूलचा पाचवी ते दहावीचा पट घसरलेला होता. गेली तीन वर्षे त्यांनी ही पटसंख्या वाढवण्यासाठी अथक मेहनत घेतली आहे. स्वतः कनिष्ठ महाविद्यालयात शिकवत असताना एम. आर. हायस्कूल टिकावे यासाठी प्रभारी पदाच्या काटेरी मुकूटाची जबाबदारी स्विकारून विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास संपादन करत हायस्कूलला संजीवनी दिली. शतकमहोत्सावाच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रशालेला नवे रूप आणले आहे.
वैयक्तिक लक्ष आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर उपक्रमामुळे गतवर्षापासून हायस्कुलचे प्रवेश हाऊसफुल्ल झाले आहेत. पालकांचा ओढा प्रशालेकडे वाढला आहे. अशा आशादायक वातावरणात श्री. कुंभार यांची बदली प्रशालेसाठी मारक ठरणारी आहे. मुळातच श्री. कुंभार हे स्थानिक आणि प्रशालेचे माजी विद्यार्थी असल्याने केवळ नोकरी न मानता आत्मियतेने वेळेचे बंधन न पाळता शाळा वाढावी यासाठी त्यांची नेहमी धडपड सुरू असते. त्यामुळे खास बाब म्हणून श्री कुंभार यांची बदली रद्द करावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे.