बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव ; आठ दिवसांचा 'अल्टीमेटम'
अन्यथा तिरडी मोर्चा काढण्याचा दिला इशारा
आजरा(हसन तकीलदार) : आजरा -बुरुडे -महागाव रस्त्यावरील खड्डे भरावे, संताजी पुलाला 100 वर्षे पूर्ण झाल्यामुळे या पुलाचे बांधकाम जीर्ण झाले असून यासाठी पर्यायी पूल तयार करावे तसेच बुरुडे भटवाडी आणि कासार कांडगाव कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी सिमेंट पाईप्स घालून गटारीच्या पाण्याचा योग्य निचरा करावा यासाठी ठाकरे शिवसेनेचा लढा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे व उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली संताजी पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. परंतु आज शुक्रवार आठवडा बाजारचा दिवस असल्याने तालुक्यातील नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या विनंतीस मान देत रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करून येत्या आठ दिवसात याबाबत ठोस निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावा अशी भूमिका घेत बांधकाम विभागाचा निषेध करण्यासाठी रस्त्यामधील खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करीत नाराजी व्यक्त केली आणि बांधकाम विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांना घेराव घालत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार केला आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना तसेच ठेकेदारांना वारंवार भेटून निवेदने देऊन,बैठका करून रस्त्याच्या कामाची व पर्यायी पुलाची मागणी करीत आहोत. पण हे अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. अधिकाऱ्यांनाच रस्ता कोणाकडे आहे हेच माहित नाही. यापूर्वी तहसीलदारसाहेब यांचे अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत लवकरच याबाबतची सविस्तर माहिती देतो असे म्हटले होते. तरीसुद्धा त्यांनी आजपर्यँत याबाबत माहिती दिलेली नाही. याबाबत लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर या विभागाच्या दारासमोर तिरडी मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
तालुका प्रमुख युवराज पोवार म्हणाले, चंदगडचे आमदार म्हणतात शक्तिपीठ आमच्या तालुक्यातून जावा, अशी त्यांनी पावसाळी अधीवेशनात मागणी केली. हा रस्ता चंदगड विधानसभा मतदार संघाच्या आमदारांच्याकडे येतो. एकीकडे या रस्त्याची डागडुगी करायला यांच्याकडे पैसे नाहीत आणि हे शक्तीपीठ मार्गाची मागणी करतात. आम्हाला शक्तिपीठ नको पण जनतेच्या रहदारीचा आणि रोजच्या गरजेचा रस्ता आहे, पूल आहे तो व्यवस्थित करावे. यासाठी आमदार साहेबांनी पावसाळी अधिवेशनात मागणी करावी. मतदार संघातील जनतेचे जीव वाचवावे आणि दळणवळणाची सुविधा निर्माण करावी. जशी इंद्रायणीच्या नदीवरचा पूल कोसळून जिवीत हानी झाली तशी येथेही घटना होऊ नये म्हणून आम्ही येथे निदर्शने केली. आठ दिवसात यावर योग्य निर्णय घ्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडीमार करत म्हणाले, पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या शब्दाला मान देऊन आमचे आजचे रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करीत आहोत. परंतु आठ दिवसात जर यावर योग्य निर्णय नाही झाले तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
यावेळी सुनील बागवे (उपसरपंच बुरुडे ), सौ. प्रमिला पाटील (उपसरपंच हत्तीवडे ), विलास जोशीलकर(सरपंच मेंढोली), सौ. वैषाली गुरव (सरपंच बुरुडे), संजय येसादे, दयानंद भोपळे, सुनील डोंगरे, दिनेश कांबळे, शिवाजी आढाव, हरिश्चंद्र व्हराकटे, समीर चांद, महेश पाटील, ओंकार मद्याळकर, सुयश पाटील सौ. गीता देसाई (महिला आघाडी प्रमुख ), संजय कांबळे, बिलाल लतीफ, बबन कातकर, शिवाजी इंगळे, शिवाजी कुंभार, चंदर पाटील,सूर्यकांत कांबळे,हत्तीवडे,बुरुडे, बोलकेवाडी, मेंढोली, बुरुडे, भटवाडी इ. गावचे ग्रामपंचायत सदस्य, महिला पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.