तातडीने सीएनजी उपलब्ध करून देण्याची ठाकरे शिवसेनेची मागणी
प्रांताधिकारी यांना निवेदन देत वेधले लक्ष
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील पेट्रोल पंपावर गेल्या पंधरा दिवसापासून सीएनजी पुरवठाच बंद असल्याने शहरातील रिक्षा चालकांची गैरसोय होत आहे. तातडीने उपलब्ध करून ही गैरसोय दूर करावी अशी मागणी रिक्षा चालक संघटनेच्या वतीने शिवसेनेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गडहिग्लज शहराचा विस्तार वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी सध्या शहरात दोनशेपेक्षा अधिक रिक्षा प्रवाशांच्या सेवेत आहेत. रिक्षासाठी इंधन म्हणून सी. एन. जी.चा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतु येथे एकाच पेट्रोलपंपावर सी.एन. जीची व्यवस्था आहे. मात्र या पंपाच्या व्यवस्थापनाकडून वाहनधारकांना योग्य वागणूक मिळत नसून वेळेवर सी. एन. जी उपलब्ध होत नाही. गेल्या १५ दिवसापासून पंपावर सी. एन. जीचा पुरवठा बंद असल्याने शहरातील रिक्षा चालकांना संकेश्वर, उत्तूर, आजरा येथे जावून सी.एन. जी घ्यावा लागतो. त्यामुळे रिक्षा चालकांची गैरसोय होत आहे. परिणामी प्रवाशांना सुद्धा वेळेवर सेवा देण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांसाठी तालुका संघाच्या पेट्रोल पंपावर सी.एन.जी.ची व्यवस्था तातडीने करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख प्रकाश रावळ यांच्यासह रिक्षा चालक उपस्थित होते.