प्रसिद्धी पत्रकातून आरोप ; कुचेष्टा थांबून पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
आजरा : आजरा तालुक्यातील आंबेओहोळ धरणग्रस्त पुनर्वसन प्रश्नी लोकप्रतिनिधींकडून गांभीर्याने प्रश्न सोडवण्या ऐवजी केवळ बैठका घेऊन टाईमपास सुरू आहे, असा आरोप धरणग्रस्त संग्राम संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केला आहे.
या पत्रकात कॉम्रेड गुरव यांनी म्हटले आहे की, आंबेओहोळ हा धरणग्रस्तांचे पुनर्वसन रखडणारा महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्प आहे. धरणग्रस्तांची गेली 25 वर्ष कुचेष्ठा सुरु आहे. हा प्रश्न गांभीर्याने न घेता लोक भेटण्यासाठी येतात म्हणून बैठका घ्यायच्या, अधिकाऱ्यांचा आढावा ऐकून घ्यायचा. प्रत्येक वेळी प्रश्न तेच चर्चा तीच मात्र प्रगती काहीच नाही. प्रत्यक्ष ज्यांचे पुनर्वसन बाकी आहे त्यांच्याशी किंवा संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा न करता ज्यांना पुनर्वसनाचे प्रश्न माहीत नाहीत ते बैठकीला बसून आज पर्यंत 100 पेक्षा जास्त बैठका घेतल्याचे सांगून पुन्हा पुन्हा बैठक घेऊन टाईमपास करणे एवढेच होत आहे. वास्तविक संकलन दुरुस्ती सारखे प्रश्न स्थानिक जिल्हा पातळीवर आहेत, काही शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या पण त्यांच्या सातबारावर चुकीच्या पद्धतीने बोजा चढवला आहे. याला पुनर्वसन म्हणायचे का? करार होऊन २ ते ३ वर्षे पूर्ण झाली तरी देखील काही शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांना जमिनी मिळालेल्या आहेत पण घर बांधणीचे भूखंड मिळाले नाहीत.
गेली 25 वर्ष शेतकरी पुनर्वसनाची चातकाप्रमाणे वाट पाहतो, मात्र अधिकारी व लोकप्रतिनिधी बैठका घेऊन नुसता टाईमपास करत आहेत. असेच होत गेल्यास अजून दहा ते पंधरा वर्षे पुनर्वसन होईल असे वाटत नाही. त्यामुळे धरणग्रस्तांची कुचेष्टा थांबवून गांभीर्याने घ्यावे व पुनर्वसन करावे. अशी मागणी कॉम्रेड गुरव यांनी या पत्रकातून केली आहे.