दिवसाढवळ्या धूम स्टाईल 'चेन स्नॅचिंग' झाल्याने खळबळ
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील भडगाव रोडवरून अयोध्या नगरकडे पायी चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेले. सकाळी साडेदहाच्या सुमारास दिवसाढवळ्या धूम स्टाईलने चोरट्यांनी 'चेन स्नॅचिंग' केल्याने शहरात खळबळ उडाली होती. मीनाक्षी निळकंठ जंगमणी ( वय ६१, मूळगाव रांगोळी कॉलनी, शाहूपुरी सातारा) यांनी गडहिंग्लज पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मूळच्या साताऱ्याच्या असणाऱ्या मीनाक्षी जंगमनी ह्या पाडव्यानिमित्त गडहिंग्लजला आपल्या लेकीकडे आल्या होत्या. गडहिंग्लज जवळील दुंडगे येथे मुलीच्या सासरी असणारे कार्यक्रम आटोपून गडहिंग्लजला आल्या. येथील बसस्टॅन्डवरून अयोध्या नगरकडे जाण्यासाठी त्या भडगाव रोडने पायी चालत जात होत्या. जागृती हायस्कूलच्या पाठीमागील बाजूस समोरून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी जंगमनी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर काही नागरिकही जमा झाले मात्र तोपर्यंत चोरटे प्रसार झाले होते. याप्रकरणी गडहिंग्लज पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून तपास उपनिरीक्षक शितल शिसाळ करत आहेत.