गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव ग्रामस्थांनी सार्वजनिक गोठण विहिरीचे पूजन करत जलदिन साजरा केला. गेल्या सहा वर्षापासून दरवर्षी जलदिनी या विहिरीचा वाढदिवस साजरा केला जातो.
बजरंग दूध संस्थेचे चेअरमन रवींद्र शेंडुरे व पोलीस पाटील उदय पुजारी यांच्या हस्ते विहिरीचे पूजन करण्यात आले. जलदिनानिमित्त विविध फलकाद्वारे पाणी बचतीचा संदेश ग्रामस्थांना देण्यात आला. या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. विहिरीवरही असे फलक लावण्यात आले होते. भडगाव ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गावालगत सार्वजनिक गोठण विहीर आहे. ही विहीर १९५१ साली जिल्हा लोकल बोर्डाच्या माध्यमातून ९९९८ रुपये खर्चून बांधण्यात आली आहे. भडगावकरांचे तहान भागवण्याचे काम अविरतपणे ही विहीर करत आहे. गेल्या सहा वर्षापासून या विहिरीचे पूजन करून भडगाव ग्रामस्थ जलदिन साजरा करतात.
यावेळी उपसरपंच रविशंकर बंदी, ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, बसवराज बंदी, दीपक कोरी, विजय पट्टणकुडी, सुभाष चोथे, सचिन विभुते, विरुपाक्ष हुक्केरी, सचिन हरळीकर, शशिकांत बंदी, अक्षय स्वामी, बाळासाहेब कांबळे, ताजुद्दीन हवालदार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन वसंत नाईक, महादेव भकरी, विनायक तोडकर, शिवानंद यशागोळ, व्यंकटेश बंदी यांनी केले होते.