Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज विद्या संकुलामध्ये भरला 'कँपस बझार'

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील शिवराज विद्या संकुलामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कँपस बझार २०२३' ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रारंभी समन्वयक डॉ. श्रद्धा पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वत: व्यावसायिकता जपावी व यातून विद्यार्थ्यांचे व्यावसायिक कौशल्य विकसित व्हावे या हेतुने आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. या बझारमध्ये मसाला ताक, थंडाई, अन्य विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा मनमुराद आस्वाद खवय्यांनी घेतला. तसेच कोल्हापुरी चपला, आर्टीफिशेल ज्वेलरी, वाचनीय पुस्तके, विविध प्रकारच्या वस्तू स्टॉलवर मांडण्यात आली होती.

शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उदघाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील रोपाला पाणी घालून करण्यात आले.

या उपक्रमाच्या उदघाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी ग्रीनिती फार्मिंग सोल्युशनचे सीईओ अक्षय घोरपडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सध्या शेतीमध्ये आमुलाग्र बदल होत आहे. या बदलाला आता योग्य़वेळी बझार उपलब्ध होणे काळाची गरज आहे. ही गरज ओळखून आपण होणारा विकास शाश्वत आहे का ? हे पाहणे गरजेचे आहे. या शाश्वत विकासाला बळ देण्याचा प्रयत्न अशा प्रकारच्या छोट्या-मोठ्या बझारच्या माध्यमातून उपलब्ध व्हावे. यातून स्वयंपूर्ण जीवन जगता येते का हे पाहणे गरजेचे आहे. कॉलेजमध्ये असे उपक्रम सतत व्हावेत यातून विद्यार्थ्यांना उद्योजक म्हणून घडण्याची संधी आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा परिषदचे समन्वयक विकास अवघडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये कार्यकुशलता वाढावी तसेच उद्योजकता रुजावी यासाठी शिवराज विद्या संकुलाच्या आजच्या या उपक्रमातून या भागातील नवउद्योजक निर्माण होतील. असा हा उपक्रम विद्यार्थ्यांना दिशा देणारा असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना विशेष प्रेरणा देणारा हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी कॉलेजमधील बझारच्या या उपक्रमामध्ये सहभागी होऊन खरेदी-विक्रीचा लाभ घ्यावा, यातून मिळणार्‍या अनुभवातून उद्याचे उद्योजक निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य डॉ एस.एम.कदम यांनी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा परिषद यांच्या माध्यमातून हा आगळा-वेगळा उपक्रम राबविला जात आहे याचा लाभ विद्यार्थ्यांनी, सर्व शिक्षक व प्रशासकीय सेवकांनी घ्यावा असे आवाहन केले. नेहरू युवा केंद्राचे समन्वयक वैष्णवी भालवणीकर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास कलाशिक्षक रमण लोहार, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, प्रा.पौर्णिमा कुराडे, डॉ.ए.जी. हरदारे, डॉ आर.पी. हेंडगे, प्रा.दिपिका खांडेकर-पंडीत, प्रा.एम.आर.दंडगे, प्रा.श्रुती पाटील, प्रा.रेवती राजाराम, प्रा. तेजस्विनी शिंदे, अक्षय पाटील यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा.नाझिया बोजगर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.