Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पुढे चोरी झाली आहे, अंगावरची दागिने काढून ठेवा!

गडहिंग्लज तालुक्यात पंधरा दिवसातील दुसरी घटना

भामट्यांचे धाडस वाढले, दिवसाढवळ्या हातचालाकिने चोरी 

नागरिकांनीही अशा भामट्यांपासून सतर्क राहण्याची गरज

संशय येताच पोलिसांना कल्पना देण्याची आवश्यकता 

या भामट्यांना जेरबंद करण्यासाठी  नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याची गरज   


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
'पुढे चोरी झाली आहे अंगावरची सर्व दागिने काढून ठेवा' अशी बतावणी करत हातचालाकिने दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी हातोहात सोन्याची दागिने लांबविण्याच्या घटना घडत आहेत. गडहिंग्लज तालुक्यात गेल्या पंधरा दिवसात अशा दोन घटना घडल्याने नागरिकातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भामट्यांना पकडण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. अशा भामट्यांपासून नागरिकांनीही वेळीच सावध होणे फार गरजेचे आहे. अशा भूलथापा मारणाऱ्या भामट्यांचा संशय आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधल्यास पोलिसांना त्याा भामट्यांना जेरबंद करणे शक्य होईल.

गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथे ५ मार्च रोजी पोलीस असल्याचा बहाणा करून वृद्धेचे पाच तोळे दागिने भामट्यांनी हातोहात पळविले होते. 'गावात चोरी झाली आहे, या रस्त्यावरून सोन्याचे दागिने घालून जाऊ नका' असे सांगत या भामट्यांनी सदर वृद्धेला अंगावरची दागिने काढण्यास सांगून पुडीत बांधून देण्याचा बाहाणा करत पाच तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या लांबविल्या होत्या. ही घटना नेसरीतील संकल्प हॉस्पिटल जवळ घडली होती. 

दरम्यान, सोमवारी ( दिनांक २० मार्च) गडहिंग्लज शहरात वर्दळीच्या भर वीरशैव चौकात देखील अशाच प्रकारची घटना घडली आहे. या घटनेमध्ये एलआयसीच्या येथील शाखेत वरिष्ठ सहाय्यक म्हणून सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यालाच या भामट्यांनी अशाच पद्धतीने हातचालाकिने फसवून त्यांच्याकडील सोन्याची दागिने पळविली आहेत. भर चौकात या भामट्यांनी या अधिकाऱ्याला गाठत 'चोरीचे प्रमाण वाढले आहे अंगावरील दागिने काढून ठेवा' अशी बतावणी करत दागिने रुमालात बांधून दिल्यासारखे करून हातचालाकिने पळविल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

नेसरी व गडहिंग्लज येथे गेल्या पंधरा दिवसात अशा दोन घटना घडल्या आहेत. या दोन्हीही घटनेतील अज्ञात भामटे सीसीटीव्हीत कैदे झाले आहेत. त्या दृष्टीने पोलिसांचा तपासही सुरू आहे. दिवसाढवळ्या हातचालाकिने दागिने पळविण्याचे धाडस या भामट्यांचे वाढल्याने नागरिकातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज

'पुढे चोरी झाली आहे अंगावरची दागिने काढून ठेवा', 'मी पोलीस आहे या रस्त्यावरून अंगावर दागिने घालून जाऊ नका' अशा भुलथापा मारणाऱ्या व्यक्तींपासून नागरिकांनीही वेळीच सावध होणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींचा संशय आल्यास तात्काळ पोलिसांशी नागरिकांनी संपर्क साधल्यास अशा घटना टाळणे शक्य होईल व चोरट्यांना जेरबंद करण्यास पोलिसांनाही मदत होईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.