६९-७०सालातील न्यू इंग्लिश स्कूल नूल येथील अकरावी जुनी मॅट्रिकच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
वास्तव जीवनातील आजी- आजोबांनी दिला शालेय आठवणींना उजाळा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): विविध क्षेत्रात सेवा बजावून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या माझ्या सर्व मित्रांनी जीवन अनमोल असून मुक्तपणे व आनंदात जगावे असे सांगत आनंदी जीवनाच्या अनेक वाटांची ओळख करून देताना योग-प्राणायाम, समतोल आहार, आवश्यक झोप, सकाळ संध्याकाळचे चालणे, कौटुंबिक सामुहिक सहलींचे आयोजन, छंदांची जोपासना, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमातील सहभाग याद्वारे आपले शरीर,मन तंदुरुस्त ठेवा. शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून निसर्गातील अगदी छोट्या मुंगी पासूनदेखील कार्यतत्परता व प्रयत्नवाद हे गुण घेता येतात. प्रत्येकाच्या जीवनात गुरूंना अनन्यसाधारण महत्व असून त्यांच्यामुळेच आपण घडलो ही जाणीव असली पाहिजे असे प्रतिपादन हुपरी येथील शांताबाई चंद्राप्पा शेंडूरे महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य गणपतराव चव्हाण यांनी केले.
न्यू इंग्लिश स्कूल नूल (ता.गडहिंग्लज) येथे शिकलेल्या १९६९-७० च्या अकरावी (जुनी मॅट्रिक)च्या वर्गमित्रांनीआयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.माजी मुख्याध्यापक शिवाजीराव पाटील अध्यक्षस्थानी होते. सदरचा स्नेह मेळावा नांगनूर (ता.गडहिंग्लज) येथील श्रीराम मंदिरात पार पडला.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. निवृत्ती कासारकर यांनी गुरूवंदनेचे गायन केले. रामचंद्र रावण यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेले माजी विद्यार्थी नारायण सुपले, नागेश सुतार, निवृत्ती कासारकर, शिवलिंग चिकोडी, लक्ष्मण चव्हाण, काशाप्पा व्हंजी,आप्पासाहेब व्हंजी,रामचंद्र रावण यांचा सत्कार गुरूवर्य गंगाराम माने व माजी जिल्हा क्रिडाधिकारी शशिकांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त पोलीस उप-अधिक्षक बाळासाहेब गवाणी-पाटील, माजी मुख्याध्यापक शिवाजीराव पाटील, ॲड. जयराम पाटोळे, माजी मुख्याध्यापक भैरू बिरंजे, माजी मुख्याध्यापक दिनकर शिंदे, विलास चव्हाण यांची मनोगते पार पडली. सर्वांचे गुरूवर्य गंगाराम माने यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यापुढे गरीब व आपत्तीग्रस्त सहकाऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे निश्चित करण्यात आले. माजी प्राचार्य दिनकर सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले. यावेळी म्हमूलाल सनदी,यशवंत खैरे,अमृत घेवडे,मुमताज ठगरी, काळव्वा सुतार,पारूताई पट्टणशेट्टी, मल्लम्मा माळगी,मलिकमा काजी,शिवाजीराव मोकाशी, सखाराम कासारकर, बाबूराव थोरात,अशोक येणेचवंडी यांच्यासह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.