सरपंच, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत वेधले लक्ष
अहवाला विरोधात आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील खडी क्रशरसाठी हलकर्णीसह, चंदनकुड, इदरगुच्ची, कडलगे, कुंबळहाळ या ग्रामपंचायतीनी दिलेल्या दाखल्यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या पंचायत समितीच्या चौकशी समितीने सादर केलेला अहवाल ढोबळमानाने आणि कायदेशीर बाबींना धरून नसून हा अहवाल चुकीचा व दिशाभूल करणारा आहे असा आरोप खडी क्रशर विरोधी शेतकरी संघर्ष कृती समिती व मुक्ती संघर्ष समितीने केला आहे. या समितीने हा अहवाल अमान्य करत गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनातून लक्ष वेधले आहे. मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. दरम्यान, या चौकशी समितीच्या अहवाला विरोधात पुणे विभागीय आयुक्त व कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कोणतीही कायदेशीर खातरजमा न करता आणि सखोल अभ्यास व तपासणी न करता संबंधित चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून संविधानिक ग्रामसभेच्या हेतूला नाकारत ग्रामपंचायत अधिनियम मधील तत्वांचा व कायद्याचा चुकीचा अर्थ लावत हेतू पुरस्कर सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्यावरील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी हा अहवाल दिला आहे. व्यापक लोकहिताचा विचार न करता त्यांनी कर्तव्यात कसूर केलेली आहे. सूचना व ठराव यात गल्लत करून सरपंच व ग्रामसेवक यांना वाचवण्याची चौकशी समितीने धडपड केलेली आहे. लोकहिताचा मुद्दा ग्रामपंचायत बदलत असेल आणि ग्रामसभेच्या ठरावाला कोणतेही कारण न देता नाकारत असेल तर संबंधित ग्रामपंचायतीवर कारवाई केली पाहिजे. चौकशी समितीने दाखल्यांच्या बाबत शाब्दिक खेळ करून सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना कारवाईपासून वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच मुक्ती संघर्ष समितीने दिलेले निवेदन त्यांनी संपूर्णपणे वाचलेले नाही किंवा वाचून त्यातील मुद्दे गाळून "चौकशी" चौकशी समितीने केलेली आहे.
निवेदनावर मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, राजू पाटील, उत्तम खानापुरे, कृष्णा कांबळे, सोमनाथ शिंदे, विनायक कांबळे, राहुल दास, तानाजी जोशीलकर, संजय शिंदे आदींच्या सह्या आहेत.