गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लजसह सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. काळभैरव देवाचा जन्मकाळ सोहळा डोंगरावर उत्साहात पार पडला. जन्मकाळ सोहळ्यानिमित्त श्री काळभैरव देवाची आकर्षक रूपात पूजा बांधण्यात आली होती.
जन्मकाळ सोहळ्यानिमित्त मंदिर परिसराची झेंडू फुलांनी सजावट करण्यात आली होती. विद्युत रोषणामुळे मंदिर परिसर उजळून निघाला. "भैरीच्या नावानं चांगभलं" च्या गजरात डोंगरावरील श्री. काळभैरव देवाच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंगळवारी रात्री शहरातील लिंगायत समाजाच्या वतीने नैवेद्य झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. पहाटे काकड आरती झाली. त्यानंतर अभिषेक घालण्यात आला. दुपारनंतर जन्मकाळ सोहळा पार पडला. यावेळी पंच, मानकरी व पुजारी यांच्यासह भक्तांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. या जन्मकाळ सोहळ्यानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. जन्मकाळ सोहळ्यासाठी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.