शिवराज महाविद्यालयात बिरसा मुंडा यांची जयंती साजरी
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जननायक बिरसा मुंडा यांनी इंग्रजांच्या विरोधात विविध प्रकारची आंदोलने उभी केली. या आंदोलनातून आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाला त्यांनी वाचा फोडली. यासाठी त्यांनी इंग्रजांच्या विरोधात प्रत्यक्ष युद्ध करून त्यांना अनेकवेळा नामोहरण केले.आपल्याजवळ कोणत्याही प्रकारची राज्यघराण्याची परंपरा नसताना केवळ वैचारिक जाणीव, जिद्द आणि एकसंघतेच्या जोरावर इंग्रज फौजांवर बिरसा मुंडा यांनी काहीकाळ आपली दहशत निर्माण केली. बिरसा मुंडा यांचा हा लढा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन प्रा. नरसिंग एकीले यांनी केले.
येथील शिवराज महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते. स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे डॉ. जी.जी.गायकवाड यांनी केले.
प्रारंभी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा.एन. बी.एकीले पुढे म्हणाले, जननायक बिरसा मुंडा यांनी जल, जंगल आणि जमीन यावर आदिवासींचा प्रथम हक्क आहे. त्यामुळे त्यांनी जल, जंगल आणि जमीन वाचवण्यासाठी इंग्रजांना नेहमी विरोध केला असे सांगून बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमास प्रा. सौ बिनादेवी कुराडे, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डी.पी. खेडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.


