माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगुले यांचे प्रतिपादन
गडहिंग्लजला जागृतीच्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिष्यवृत्ती परीक्षा ही फक्त गुणांची शर्यत नसून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे नियोजन आणि परिश्रमाचे भक्कम धडे देणारी ही सुवर्णसंधी असून आपल्या स्वप्नांना पंखांचे बळ मिळावे ही उज्वल भविष्यासाठीची पहिली पायरी भरभक्कम व्हावी यासाठी जागृती हायस्कूलची वाटचाल शिखराकडे जात असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूरचे विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी जागृती हायस्कूलच्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सतीश घाळी होते.
स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीरंग तांबे यांनी केले. सचिन मगदूम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी बोलताना सुभाष चौगुले म्हणाले, विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या शर्यतीत न अडकता वाचनाची सवय, जिज्ञासा, अभ्यासातील सातत्य, आत्मपरीक्षण आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
डॉ. सतीश घाळी म्हणाले, शिष्यवृत्ती परीक्षेत जागृतीने घवघवीत यश संपादन करून दबदबा निर्माण केल्यामुळे सर्वांचा आत्मविश्वास वाढला असून हा पॅटर्न राज्यात लय भारी असल्याचे सांगून ही मेहनत सातत्याने पुढे चालू ठेवण्याचे आवाहन केले. कुडाळचे मुख्याध्यापक सुनील भात्तीवडेकर यांचेही भाषण झाले.
शिष्यवृत्तीधारक कुमारी सोनाली पाटील, इसा मुल्ला, कुमारी श्रद्धा मगदूम, कुमारी अमृता पाटील,समर्थ शिंदे, कुमारी केतकी माने, हेरंब मांगले, कुमारी प्रेरणा रावण, कुमारी प्रगती खटावकर यांसह जवळजवळ २७ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते कोल्हापुरी फेटा, सन्मान चिन्ह, व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी माजी मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले, बी.एडचे प्राचार्य डॉ. एस. एन.शिंदे, मुख्याध्यापक उमेश सावंत शिवाजी आनावरे, प्रा. विद्या पन्हाळे, प्रा. स्वाती क्षीरसागर, प्रा. गुरुलिंग खंडारे यासह सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.गिता पाटील व सौ. कल्पना शिंदे यांनी तर आभार उपमुख्याध्यापक बी.जी. कुंभार यांनी मानले.



.jpg)

