गडहिंग्लजला ठाकरे शिवसेनेचे प्रांताधिकार्यांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): चंदगड येथील दौलत सहकारी साखर कारखान्याने आधुनिकीकरणासाठी घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी एनसीडीसीने लिलाव करण्याची नोटीस बजावली आहे. कारखान्यावरील ही कारवाई तात्काळ थांबवावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने गडहिंग्लज येथे प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. सदर निवेदन कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, चंदगड येथील दौलत सहकारी साखर कारखाना अर्थिक अडचणीत आल्याने सरफेसी कायद्याअंतर्गत जिल्हा सहकारी बँकेने ताबा घेऊन हा कारखाना ३९ वर्षाच्या कराराने अथर्व प्रा. लि. या कंपनीस भाडेतत्वावर चालविण्यास दिला आहे. तत्कालीन संचालक मंडळाने पार्टीकल बोर्ड कारखान्याच्या आधुनिकीकरणासाठी घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी एनसीडीसीने कारखान्याचा लिलाव करण्याची नोटीस दिली आहे. या प्रकाराने शेतकरी व सभासदांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. खरेतर यापूर्वीच तत्कालीन संचालक मंडळावर कारवाई होणे आवश्यक होते परंतू ती झाली नाही. जिल्हा बँकेने ताबा घेऊन एका कंपनीला कारखाना चालविण्यास दिल्यानंतर होणारी कारवाई चुकीची वाटते. या कर्जाची जबाबदारी कारखाना ताब्यात घेतल्यानंतर जिल्हा बँकेकडे आणि त्यानंतर अथर्व कंपनीकडे जाते
चंदगडसारख्या डोंगराळ भागात चार दशकापूर्वी तत्कालीन संचालक मंडळाने अनेक अडथळे पार करून कारखान्याची उभारणी केली आहे. या प्रकल्पावर हजारो शेतकरी, शेकडो ऊसतोड मजूर, वाहतूक करणारे कामगार त्यांचे भविष्य अवलंबून आहे. कारखाना उभा करताना कर्ज काढून आपल्याकडील दागिने गहाण ठेवून भाग खरेदी केले होते. शेतकऱ्यांची नाळ या प्रकल्पाशी घट्ट जोडलेली आहे. कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहिला पाहिजे ही भावना असल्याने सध्या सुरू असलेल्या कारवाईने शेतकरी अस्वस्थ आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन तत्काळ संयुक्त बैठक घेऊन यावर मार्ग काढावा व लिलाव प्रक्रिया थांबवावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निवेदनावर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, अशोक निकम, राजू रेडेकर, संभाजी पाटील, शांता जाधव, विष्णू गावडे, दिलीप माने, अजित खोत, गणेश बागडी, उदय मंडलिक, अनंत शिंदे, वसंत नाईक, बळीराम पाटील आदींसह इतरांच्या सह्या आहेत.