आजरा (हसन तकीलदार): आजच्या धावपळीच्या युगात माणूस आपली नाती विसरत चालला आहे.विविध कारणांनी लुप्त होत चाललेली एकत्र कुटूंब पद्धतीमुळे विरळ आणि लुप्त होत चाललेले नात्यांचे बंध आणि त्यामुळे प्रेम,आपुलकी, आदर,आस्था या मानवी भावनांची संवेदना कमी कमी होताना दिसत आहे.याचा पुन्हा पाझर फुटावा यासाठी देवर्डे येथील पाटील कुटुंबियांनी अनोखा संकल्प करीत एक कुळ एक गणपती हा उपक्रम राबवित समाजाला एक आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे पंचक्रोशीत कौतुक होताना दिसत आहे.
विखुरलेली ( स्वतंत्र) कुटुंब पद्धती ही आपल्याला शहरात पहावयास मिळायची पण हे चित्र आता ग्रामीण भागातही पहावयास मिळत आहे म्हणून विखुरलेल्या विभागलेल्या सर्व कुटूंबियांनी एकत्र येऊन एकाच मुर्तीच्या साक्षीने गणेशोत्सव सामुदायीकरित्या साजरा केला तर...?सर्वांनी एकत्र येत भक्ती, प्रसाद, स्नेह, आदर एकमेकांना देत आणि पर्यावरण पूरक गणपतीउत्सव साजरा होत असेल तर किती सुंदर दृश्य आहे विचार करण्यासारखे आहे.
काही दिवसांसाठी का असेना आपण एकत्र कुटूंबाची अनुभूती घेऊ शकू या आनंदी व उत्साहाच्या वातावरणामध्ये एकत्र आल्याने आपल्यातील प्रेम,भावना आणि नातेसंबंध अधिक घट्ट होण्यास सर्वार्थाने मदत होईल त्याचबरोबर एकमेकांच्या मनातील दऱ्या दूर होऊन बापांच्या साक्षीने एकोपा वाढीस लागायला मदत होईल.
एक कुळ एक गणपती' या संकल्पनेमुळे या उत्सवामधील फटाक्यांची आतिषबाजी इत्यादीवर मर्यादा आणुन ध्वनी व हवा प्रदुषण ही रोखता येईल या संकल्पनेतून देवर्डे येथे पाटील कुटुबीयांनी सुरु केलेल्या उत्सवासाठीचे हे तिसरे वर्ष असून आनंदाची बाब म्हणजे या संकल्पनेचे महत्व समजल्यांने सदस्य सख्येमध्ये प्रति वर्षी वाढ होताना दिसत आहे. असे सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष जी. एम पाटील यांनी सांगितले.