गडहिंग्लज (प्रतिनिधी): हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त मुत्नाळ येथील श्री दुरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजी अनावरे होते.
मान्यवरांच्या हस्ते हॉकीचे आयकॉन मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. क्रीडा दिनाचे स्वागत व प्रास्ताविक राजेंद्र पाटील यांनी केले. क्रीडा शिक्षक बाळासाहेब खरात यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला आणि जीवनामध्ये खेळाचे व आरोग्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
मुख्याध्यापक शिवाजी अनावरे यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्न व सातत्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास पुजारी यांनी केले तर आभार वैशाली कागवाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी कल्पना पाटील, दत्ता लोहार, पार्वती पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.