गडहिंग्लजला जागृती हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): देशाचे महान हॉकी खेळाडू व हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त शहरातील जागृती हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ.कंचन बेल्लद तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक बी.जी. कुंभार उपस्थित होते.
मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा.डॉ. कंचन बेल्लद यांच्या शुभहस्ते झाले. स्वागत व प्रस्ताविक कुमारी तेजस्विनी नाईक हिने केले. क्रीडा विभाग प्रमुख संपत सावंत यांनी अतिथी परिचय करून दिला. यावेळी प्रा. डॉ. कंचन बेल्लद यांनी आपल्या व्याख्यानातून मेजर ध्यानचंद यांच्या जीवनपटाचे सविस्तर दर्शन घडविले. हॉकी खेळातील त्यांच्या अदभुत कामगिरी बरोबर देशप्रेम, शिस्तबद्ध जीवन आणि साधेपणा या त्यांच्या गुणांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असे त्यांनी आवर्जून सांगितले.
प्रा. डॉ. कंचन बेल्लद म्हणाले, खेळ हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असून तो शरीराला बळ देण्याबरोबरच आत्मविश्वास, नेतृत्वगुण व संघभावना निर्माण करणे. खेळ हा व्यायामाचा सर्वोत्तम प्रकार असून विद्यार्थ्यांचे मन एकाग्र होऊन अभ्यासाची गती वाढविण्यासाठी खेळणे गरजेचे आहे. त्यामुळे शिस्त, टीमवर्क आणि नेतृत्वगुणाचा विकास साधला जातो असे मत व्यक्त केले. कु. वर्षा यादगुदी हिने भाषण केले. बी.जी. कुंभार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. इराप्पा मरडी, दशरथ वरोटे ,सागर मगदूम यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सृष्टी पाटील हिने तर कुमारी आदित्य पाटील हिने आभार मानले.