भाषा लादल्याने मुलांच्या डोक्यावर ओझे - प्रा. सुनील शिंत्रे
गडहिंग्लजला जनवादी सांस्कृतिक चळवळ, सारथी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे व्याख्यान संपन्न
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : भाषा ही आपली ओळख असते. आपल्या संस्कृतीचे ती निदर्शक असते. प्रत्येक भाषेला स्वतःची संस्कृती, इतिहास आणि साहित्य यांची परंपरा असते. पण अनेक घटितांमुळे होणाऱ्या बदलांसाठी भाषा मुलाधार ठरते. भाषेच्या आधारावर राजकारण करून सत्तांतर झालेली अनेक उदाहरणे आपणास पहावयास मिळतात. आज भाषेच्या आधारावर अस्मितेचे राजकारण केले जात आहे; पण हे अस्मितेचे राजकारण घातक आहे. बहुभाषिक असणाऱ्या आपल्या देशात अस्मितेच्या राजकारणामुळे मातृभाषेचा प्रश्न मात्र टांगताच राहिला आहे. मातृभाषा कोणती? हे अद्यापही आपणास निश्चित करता आलेले नाही. भाषा ही अभिजन वर्गाचे प्रतिनिधित्व करीत असते. भाषेच्या आतमध्ये एक अभिजनवादी राजकारण असते. याशिवाय इंग्रजीच्या आडून आज भाषिक वर्चस्ववाद निर्माण केला जात आहे. हे आपल्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक देशाला परवडणारे नाही. असे मत नांदेड विद्यापीठाच्या भाषा व वाङ्मय संकुलाचे प्रमुख डॉ. दिलीप चव्हाण यांनी 'भाषा, संस्कृती आणि वर्चस्वाचे राजकारण' या विषयावर बोलताना व्यक्त केले.
जनवादी सांस्कृतिक चळवळ आणि सारथी चॅरिटेबल ट्रस्ट, गडहिंग्लज यांच्यावतीने डॉ. घाळी कॉलेजमध्ये व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दत्ता पाटील होते.
यावेळी बोलताना डॉ. चव्हाण पुढे म्हणाले, भाषा, संस्कृती आणि राजकारण एकत्र येऊन वर्चस्वासाठी लढले जातात. ज्यामुळे सामाजिक व राजकीय प्रभाव निर्माण होतो. भाषा, संस्कृती आणि वर्चस्वाचे राजकारण हे एक जटिल समीकरण झाले आहे. आज भाषेचा वापर केवळ संवाद साधण्यासाठीच नाही; तर सांस्कृतिक आणि राजकीय अभिजनवादी शक्तीचे प्रतीक म्हणूनही केला जात आहे. पण कोणत्याही भाषेचा वापर वर्चस्व किंवा संघर्ष निर्माण करण्यासाठी होणार नाही याकडे आपण सजगतेने पाहिले पाहिजे. भाषेच्या आधारावर आज राजकीय ध्रुवीकरण आणि संघर्ष होत आहेत. राष्ट्रीय स्तरावर एखाद्या भाषेला महत्त्व अधिक दिले तर इतर स्थानिक, प्रादेशिक भाषावर त्याचा दबाव निर्माण होतो. शिक्षणामध्ये सुद्धा विशिष्ट भाषेचाच वापर अधिक केला तर इतर भाषिक समुदयांना कमी संधी मिळते. भाषिक वर्चस्वामुळे समाजात विषमतेची भावना निर्माण होते. सांस्कृतिक विविधता कमी होऊ शकते. त्यातून भाषा आणि संस्कृती नामशेष होण्याचा धोकाही असतो. भाषा ही केवळ संवाद व अभिव्यक्तीचे माध्यम न राहता ती सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या राजकारणात बंदिस्त करून ठेवता कामा नये. असे भाषेचे राजकारण करणे म्हणजे एका विशिष्ट सांस्कृतिक वर्चस्ववादाचा प्रभाव निर्माण करणे होय. म्हणून भाषेची वैविध्यता टिकून ठेवायला हवी असेही ते म्हणाले.
भाषा लादल्याने मुलांच्या डोक्यावर ओझे - प्रा. सुनील शिंत्रे
स्वागत व प्रास्ताविक करताना सारथी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, पहिलीपासून मुलांना मातृभाषा मराठीचीच गरज आहे. मात्र त्यामध्ये इंग्रजी विषय वाढवण्यात आला. आणि पुन्हा त्यात हिंदी विषयाची भर घातल्याने मुलांच्या डोक्यावर ओझे वाढले. या गोष्टी करत असताना मुलांच्या मानसिकतेचा देखील विचार होणे आवश्यक आहे, मात्र तसे होताना दिसत नाही. केवळ भाषा लादण्याचा प्रयत्न दिसून आला आहे.
कार्यक्रमासाठी कॉम्रेड संपत देसाई, बाळेश नाईक, प्राचार्य आय. जी. फुटाणे, कल्याणराव पुजारी, अरविद बारदेसकर, तानाजी पाटील, सिद्धार्थ बन्ने, सुरेश पवार, राजेंद्र गड्डयानावर, हारून सय्यद, नागेश चौगुले, अरुणा शिंदे, सुरेखा खोत यांच्यासह इतर मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. आभार साताप्पा कांबळे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. निलेश शेळके यांनी केले.