आजरा (हसन तकीलदार): महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कोल्हापूर व भैरीदेव सेंद्रिय शेती शेतकरी गट ग्रामपंचायत आरदाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आरदाळ ( ता. आजरा) येथे रानभाजी महोत्सव पार पडला. या कार्यक्रमांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला.यात महिला बचत गटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.वेगवेगळे रानभाजीचे प्रकार प्रदर्शनात मांडण्यात आले होते. तसेच यावेळी रानभाजी पाककला स्पर्धा घेण्यात आली. रानभाजीचे 70 पेक्षा अधिक डिश शिजवलेल्या औषधीयुक्त भाज्या व भाकरी महिलांनी प्रदर्शनात मांडल्या होत्या.
जीवनात रानभाज्यांचे अनन्य साधारण महत्व आहे. आधुनिक युगात माणसाच्या जीवनात रानभाज्या लुप्त होत जात आहेत. शरीराला आवश्यक नैसर्गिक पोषक अन्नघटक मिळण्यासाठी या रान भाज्यांची ओळख होणे काळाची गरज आहे. यासाठी या रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी सहभागी महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रदर्शनामध्ये अळू, उंबर, नाल, मोहर, शेड नळीची भाजी, शेवगा, हादगा, कुर्डू,वाघाटी, कांगोणी, काटेली, घोळ,भारंगी, मोहोर, बांबू, शतावरी, अंबाडा, गुळवेल इत्यादी भाज्यांचा समावेश होता. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ते बाबासाहेब पाटील यांनी रानभाज्यांचे महत्त्व पटवून देऊन कोणत्या भाजीमध्ये कोणता गुणधर्म आहे, कोणती जीवनसत्वे आहेत, यातून कोणकोणती घटक शरीराला मिळतात याबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी 'ओळख औषधी रानभाज्यांची' या माहिती पुस्तकाचे उदघाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, सरपंच रूपालीताई पाटील, कृषी विभागाचे भूषण पाटील, दिनेश शेटे, दीपक मुळे, प्रदीप माळी, प्रकाश पाटील, विजय सिंह दळवी, अमित यमगेकर, ओंकार संकेश्वरी, अशोक कुंभार, बाळासो पाथरवट, वसंत तळेकर, मनीषा गुरव, विनायक पुंडपळ, तंटामुक्त समिती अध्यक्ष कॉ.शिवाजी गुरव ,ग्रा.प.सदस्य विठ्ठल पवार यांच्यासह ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सूर्यकांत पाटील यांनी केले तर आभार पी.जी.पाटील यांनी मानले.