स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी मिळविला प्रथम क्रमांक
आजरा (हसन तकीलदार) : येथील पंडित दीनदयाळ विद्यालयमध्ये गोपाळकाला निमित्त दहीहंडी उत्सव व राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी केले. गोकुळाष्टमी हा सण का साजरा केला जातो?त्याचे महत्त्व काय? भगवान श्रीकृष्णाची शिकवण याविषयी विद्यार्थ्यांना त्यांनी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी सुरेश गुरव व अनिल कुंभार तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण व संस्कृती प्रसारक मंडळचे सचिव मलिक कुमार बुरुड आणि इतर मान्यवरांच्या हस्ते राधा- कृष्णच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वर्षभरातील वेगवेगळ्या सणांविषयी, तसेच भारतीय संस्कृती विषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, प्रत्येक सण कसा साजरा केला जातो? हे समजावे यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्थेचे अध्यक्ष सुधीर मुंज आणि संस्थेचे सचिव मलिकुमार बुरुड यांच्या प्रोत्साहनातून गोकुळ अष्टमीनिमित्त विद्यालयामध्ये राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
या स्पर्धेसाठी जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या शाळांतून स्पर्धक आले होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. अर्चना सोमशेट्टी व डॉ सौ. गौरी भोसले यांनी काम पाहिले. या स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आजरा च्या विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला.तसेच तृतीय क्रमांकाचे व उत्तेजनार्थ बक्षीस पंडित दीनदयाळ विद्यालय आजराच्या विद्यार्थ्यांना मिळाले. बक्षीस वितरण पाहुण्यांच्या व परीक्षकांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर दहीहंडीचे उदघाटन प्रमुख पाहुणे व माता पालक यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयातील पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. कु. शरण्या सुधीर कुंभार या पाचवीच्या विद्यार्थिनीने श्रीकृष्णाच्या गाण्यावर सुंदर नृत्य केले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पालक, इतर जिल्हा परिषदेच्या शाळांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश प्रभू यांनी केले. आभार विजय राजोपाध्ये यांनी मानले.