ठाकरे शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून गडहिंग्लज तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्याकडे निवेदनातून केली आहे. अन्यथा 'भीक मांगो आंदोलन' करण्याचा इशारा देखील या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज यंदा पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी पाऊस हा मे महिन्यातच सुरु झाल्यामुळे शेतीची पूर्व मशागत व पेरणीपूर्व कामे शेतकरी करू शकला नाही. त्याच बरोबर सतत सुरु असणाऱ्या पावसामुळे काही अंशी पूर्ण झालेली पेरणी देखील पाण्यात बुडाली आहेत. तसेच सोयाबीन पिके अतिपाण्यामुळे शेतातच कुजली आहेत. भात शेतीसाठी लागणारी रोपे देखील शेतकरी टाकू शकला नाही. त्यामुळे भात व भुईमुग शेती ही जशीच्या तशी पडीक आहे. काही ठिकाणी तर बोगस बियाणामुळे पेरणी उगवलीच नाही. अशा शेतकऱ्यांचे गावनिहाय पंचनामे करून त्यांच्या नुकसानीचे अहवाल तयार करावे व गडहिंग्लज तालूक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
यावेळी तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, तालुकाप्रमुख वसंत नाईक, शहर प्रमुख प्रकाश रावळ, उपशहर प्रमुख श्रीशैलाप्पा साखरे, संकेत रावण, अंकुश चौगुले, जयवंत गुरूले, उत्तम गोरुले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.