गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांची माहिती
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मौजे बड्याचीवाडी हद्दीतील खोरी वसाहतीपासून मूळ गावाला जोडणारा पूर्वापार वहिवाटीतील गाडीवाट रस्त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनामार्फत वादी व प्रतिवादी यांच्यासमवेत बैठक आयोजित करून सामंजस्याने व आपसी तडजोडीने वादातील रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती गडहिंग्लजचे तहसिलदार ऋषिकेत शेळके यांनी दिली आहे.
मौजे बड्याचीवाडी हद्दीतील खोरी वसाहतीपासून मूळ गावाला जोडणारा पूर्वापार वहिवाटीतील गाडीवाट रस्ता खुला करून सार्वजनिक रस्ता अशी नोंद 7/12 पत्रकी व्हावी व पक्का रस्ता करून मिळण्याकरीता आमरण उपोषण करणार असल्याबाबत ग्रामस्थ बोरी वस्ती, बड्याचीवाडी यांनी दिनांक 3 मार्च 2025 रोजी तहसिलदार कार्यालयाकडे अर्ज सादर केला होता. यापूर्वी तहसिलदार गडहिंग्लज, गटविकास अधिकारी पंचायत समिती, गडहिंग्लज सरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत मौजे. बड्याचीवाडी व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या अनुषंगाने कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वादी व प्रतिवादी यांच्यासह दोन वेळा ग्रामपंचायत मौजे बड्याचीवाडी येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच प्रस्तुत प्रकरणाच्या अनुषंगाने दिनांक 20 मार्च 2025 रोजी खोरी वसाहतीकडे जाणाऱ्या वादातील रस्त्याची स्थळ पाहणी करून पंचनामा करण्यात आला व सुनावणी कामी या न्यायालयाकडून वादी व प्रतिवादी यांना रितसर नोटीसा काढून लेखी पुरावे व म्हणणे देण्याकामी पुरेशी संधी देण्यात येऊन सुनावणी घेण्यात आली.
मौजे बड्याचीवाडी हद्दीतील बोरी वसाहतीपासून मूळ गावाला जोडणारा पूर्वापार वहिवाटीतील गाडीवाट रस्ता हा या खोरीतील गट नंबर 276, 278, 299, 298, 297, 279, 316/13 या सर्वे नंबर मधून जातो. हा रस्ता दगड खडक मातीचा रस्ता असून अंदाजे 10 ते 12 फूट रुंदीचा असून सार्वजनिक व पूर्वापार वहिवाटीचा रस्ता असल्याचे स्थळ पाहणीवेळी दिसून आले. या रस्त्याव्यतिरिक्त खोरी वसाहतीपासून मूळ गावाला जोडणारा अन्य पर्यायी व नजीकचा रस्ता स्थळ पाहणीवेळी दिसून आला नाही. खोरी वसाहती मधील शालेय विध्यार्थ्यांना शाळेत, कॉलेजमध्ये जाण्यासाठी अन्य रस्ता नाही. तसेच पावसाळयामध्ये खोरी वस्तीतील नागरिकांना व शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांची फार मोठी गैरसोय होते. यामध्ये शालेय विद्यार्थी व वयोवृद्ध नागरिकांना गंभीर दुखापत होऊ नये पावसाळ्यात गरोदर माता, वयोवृद्ध व्यक्ती आजारी पडल्यास त्यांना वेळेत उपचार होण्यासाठी ग्रामपंचायत बड्याचीवाडी यांनी मौजे बड्याचीवाडी हद्दीतील खोरी वसाहतीपासून मूळ गावाला जोडणारा पूर्वापार वहिवाटीतील गाडीवाट रस्त्याची डागडुजी करणे आवश्यक आहे. प्रस्तुत प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान प्रतिवादी यांनी दिवाणी न्यायालयाकडील मनाई आदेश हजर केल्याने दिवाणी न्यायालयाच्या मनाई आदेशाचे उल्लंघन न करता व सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या मूळ हद्दीस कोणत्याही प्रकारची बाधा न करता मौजे बड्याचीवाडी हद्दीतील खोरी वसाहतीपासून मूळ गावाला जोडणाऱ्या पूर्वापार वहिवाटीतील गाडीवाट रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात यावी असे या कार्यालयाकडून दिनांक 26 जून 2025 रोजी ग्रामपंचायत मौजे बड्याचीवाडी यांना निर्देश देण्यात आले होते, असेही श्री. शेळके यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.