पावसाचा जोर कायम राहिल्यास भडगाव पुलावर दुसऱ्यांदा पाणी येण्याची शक्यता
भडगाव : सकाळी सहा वाजता टिपलेले हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीचे छायाचित्र. (छायाचित्र : वसंत नाईक, भडगाव )
गडहिंग्लज (प्रतिनिधी): काल सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने रात्रभर संततधार कायम ठेवली आहे. त्यामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा झपाट्याने वाढ झाली असून पाऊस असाच कायम राहिल्यास सायंकाळपर्यंत दुसऱ्यांदा भडगाव पुलावर पाणी येण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर भडगाव पुलाचे काम हाती घेण्यात येणार असल्याने पावसाळ्यात उद्भवणारी ही वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी निकाली लागण्यास मदत होणार आहे.
नदीच्या पाणी पातळीकडे प्रशासन, आपत्ती व्यवस्थापनची टीम व भडगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी लक्ष ठेवून आहेत. गडहिंग्लज तालुका तसेच पश्चिम भागात रात्रभर पाऊस सुरू असल्याने नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. दिवसभर हा पाऊस असाच राहिल्यास सायंकाळच्या दरम्यान पुन्हा पुलावर पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.