गडहिंग्लजला ठाकरे शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकार्यांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): 'हर घर जल' अर्थात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सर्व गावागावात सुरू असलेल्या कामांची नेमकी स्थिती, अडचणी व समस्या समजून घेण्यासाठी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे. कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. हे निवेदन निवासी नायब तहसीलदार विष्णू बुट्टे यांनी स्वीकारले.
केंद्र शासनाने हाती घेतलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन केले आहे. त्या कामाची पूर्तता होऊन सुद्धा पाणी पुरवठा सुरू झालेला नाही. वीज कनेक्शन नसल्याने अद्याप या योजनेचे पाणी ग्रामस्थांना मिळत नाही. त्याच बरोबर या योजनेसाठी रस्ते खुदाई करण्यात आल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. प्रत्येक गावात असे चित्र पहायला मिळते. त्यामुळे या योजनेची नेमकी स्थिती काय आहे हे समजणे आवश्यक आहे. त्यासाठी गटविकास अधिकारी, वीजमंडळाचे अधिकारी, तहसिलदार यांच्या उपस्थितीत या आठवड्यात बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
निवेदनावर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर, गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने, तालुकाप्रमुख अजित खोत, आजरा तालुकाप्रमुख युवराज पोवार, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, विभाग प्रमुख दिगंबर पाटील, शहर प्रमुख प्रकाश रावळ, उपशहर प्रमुख श्रीशैलाप्पा साखरे, माजी तालुकाप्रमुख विलास यमाटे आदींच्या सह्या आहेत.