न्यू युवा मंचचे शहराध्यक्ष काशिनाथ गडकरी यांचे गडहिंग्लज आगाराला निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज ते बेळगाव एसटी बस सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा न्यू युवा मंचचे गडहिंग्लज शहराध्यक्ष काशिनाथ गडकरी यांनी आगारप्रमुख गुरुनाथ रणे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, बेळगाव हे ठिकाण उद्योगधंदे, शिक्षण, व्यवसायासाठी मध्यवर्ती ठिकाण असल्याने गडहिंग्लज शहर व तालुक्यातील लोकांची या शहरात सतत ये-जा असते. मात्र येथून थेट गाडी नसल्याने गडहिंग्लज, संकेश्वर बेळगाव मार्गे प्रवास करावे लागतो. परिणामी वेळ, पैसा याचा भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागतो. प्रवाशांनी केलेल्या मागणीवरून तीन महिन्यापूर्वी निवेदनाद्वारे गडहिंग्लज आगाराकडे सदर बस सुरू करण्यासंदर्भात मागणी केली होती. मात्र अद्याप याबाबत कार्यवाही झालेली नाही. येत्या २० जुलैपर्यंत गडहिंग्लज ते बेळगाव बस सुरु करुन प्रवाशांची सोय करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून गडकरी यांनी दिला आहे. या निवेदनावर काशिनाथ गडकरी, सागर कांबळे, लक्ष्मण पाच्छापुरे, बाळू पाटील आदींच्या सह्या आहेत.