अभियंता चंद्रकांत सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूरच्या शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयाला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी गडहिंग्लजचे माजी नगरसेवक व भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेल द्वारे पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर आहे. अभियांत्रिकी शिक्षणाची ह्या विभागात कुठेच सोय नसताना जुन्या काळात आयसीआरई गारगोटी व शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर इथेच ती सोय होती. पण अभियांत्रिकीचे डिप्लोमा अभ्यासक्रमच इथे शिकवले जायचे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दोन वर्षापुर्वी कोल्हापूरला अभियांत्रिकी पदवी महाविद्यालय मंजुर केले. त्यामुळे भागातील गोरगरीब हुषार मुलांची सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकण्याची सोय झाली. सध्या जुन्या पाॅलिटेक्निक इमारतीतच त्यांचे वर्ग भरतात. विद्यानगरीच्या माळावर नवी सुसज्ज इमारत त्यासाठी साकारत आहे. करवीर संस्थानामध्ये 125 वर्षापुर्वी शिक्षणाचे महत्व ओळखून मुलांना शिक्षणाची सक्ती करुन शाळेला न जाणाऱ्या मुलांच्या पालकांना 1 रुपयांचा दंड करणाऱ्या आणि सर्व समाजाच्या गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी मोफत जेवण आणि रहाण्याची सोय व्हावी म्हणून वस्तीगृहे उभारणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहु महाराजांचे नाव ह्या महाविद्यालयाला देणे उचित होईल.
तेंव्हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची स्मृती जपण्यासाठी कोल्हापूरच्या सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजला राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत तसा ठराव पारित करून "लोकराजा राजर्षि छत्रपती शाहु महाराज शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय"असे नाव द्यावे, अशी मागणी श्री. सावंत यांनी या निवेदनातून केली आहे.