राजेश पाटील जोपर्यंत आमदार होत नाहीत तोपर्यंत माझा वाढदिवस साजरा करणार नाही!
नौकुडचे सरपंच शुक्राचार्य चोथे यांचा निर्णय
गडहिंग्लज (प्रतिनिधी): चंदगड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजेश पाटील यांनी अजितदादा पवार मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत आपला वाढदिवस जाहीररित्या साजरा न करण्याचा निर्णय 2023 साली घेतला होता, तसाच निर्णय अजितदादा पवार राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते व गडहिंग्लज तालुक्यातील नौकुड गावचे सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी देखील घेतला असून जोपर्यंत राजेश पाटील पुन्हा आमदार होणार नाहीत तोपर्यंत माझाही वाढदिवस मी साजरा करणार नसल्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे माजी आमदार राजेश पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत चंदगड विधानसभा मतदारसंघातील गावागावात केलेल्या भरीव विकास कामाचीच ही पोचपावती म्हणावी लागेल, अशी चर्चा सुरू आहे.
सरपंच शुक्राचार्य चोथे यांचा दरवर्षी 25 जून रोजी वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. संपूर्ण दिवस 500 ते 600 लोकांच्या जेवणाचे नियोजन असते. मागील वर्षी त्यांचा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला होता. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी तत्कालीन आमदार राजेश पाटील यांच्यासह इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवस साजरा न करण्याचा घेतलेल्या निर्णयाबद्दल विचारले असता सरपंच चोथे म्हणाले, चंदगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून नौकुड गावामध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे झाली आहेत. तसेच यावर्षी नौकुड गावची श्री महालक्ष्मी देवीची यात्रा झाली. यावेळीसुद्धा आमदारसाहेब यांनी उत्सवमूर्ती मंदिर कामी 10 लाख रुपये मंजूर करून घेतले व या मंदिर कामामध्ये स्वतः लक्ष देऊन हे मंदिर यात्रेपूर्वी 4 महिन्यामध्ये पूर्ण करून घेतले. सरपंच श्री. चोथे यांनी माजी आमदार राजेश पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा करून गावामध्ये विविध विकास कामे करून गावचा कायापालट केला आहे. त्यामुळे जोपर्यंत राजेश पाटील पुन्हा आमदार होत नाहीत तोपर्यंत वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे सांगितले.
आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी श्री. चोथे यांचा विचार व्हावा : कार्यकर्त्यांची मागणी
नौकुड गावचे सरपंच शुक्राचार्य चोथे हे गेल्या 13 वर्षांपासून विविध सामाजिक काम करत असल्यामुळे त्यांचा गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांचा आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत हलकर्णी मतदारसंघातून उमेदवारीसाठी विचार व्हावा अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यातून होताना दिसत आहे. नौकुड गावचे सरपंच शुक्राचार्य चोथे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयटी सेल जिल्हाध्यक्ष तसेच अखिल भारतीय सरपंच संघटना प्रसिद्धी प्रमुख पदाची जबाबदारी आहे.