गडहिंग्लज (प्रतिनिधी): अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक संघर्ष समिती यांच्या वतीने गिजवणे येथील श्री.लक्ष्मी सहकारी दूध संस्थेच्या भ्रष्टाचाराविरोधात तसेच पथविक्रेते संघर्ष समिती व मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने पथविक्रेत्यांवर झालेल्या अन्याय विरोधात प्रांताधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे व मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चाचा प्रारंभ तहसील कार्यालयापासून झाला. या मोर्चाचे नेतृत्व संग्राम सावंत, ॲड.दशरथ दळवी, प्रा. अनिल उंद्रे, प्रमोद पाटील यांनी केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. यावेळी संग्राम सावंत, ॲड. दशरथ दळवी, बाबासाहेब पाटील, विनोद पाटील, गायत्री रणदिवे यांची भाषणे झाली. त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय किसान सभा दूध उत्पादक संघर्ष समिती, पथविक्रेते संघर्ष समिती व मुक्ती संघर्ष समिती यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.
गिजवणे येथील श्री लक्ष्मी दूध संस्थेतील भ्रष्टाचाराबाबतीत बैठक घेण्याचे आश्वासन प्रांताधिकार्यांनी दिले. तसेच यावेळी गडहिंग्लज शहरातील पथविक्रेते यांच्यावर झालेल्या अन्यायाची बाजू संघटनेच्या वतीने मांडण्यात आली. जोपर्यंत 'हॉकर्स झोन' होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. विक्रीस बंदी आणल्यास त्यांच्यावर अन्याय होईल. त्यांना शासनानेरोजगार भत्ता दिला पाहिजे, अशी ही मागणी यावेळी संघटनेने केली. या चर्चेत संग्राम सावंत, ॲड. दशरथ दळवी, प्रमोद पाटील, प्रा.अनिल उंद्रे, गायत्री रणदिवे, मंगल पाटील, अमर रणदिवे, जनार्दन तोडकर, सागर शिंदे, संभाजी मोहिते, मानतेस बन्ने, कृष्णा कांबळे, विजय कडूकर,गणेश कळेकर,स्वप्निल कोरी यांनी चर्चेत भाग घेतला.



