गडहिंग्लज (प्रतिनिधी): मुत्नाळ येथील श्री दुरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्यामार्फत मुलींसाठी मंजूर झालेल्या सायकलींचा वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी तर शाळेचे माजी विद्यार्थी व ग्रामपंचायत सदस्य एल.टी.नवलाज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी प्रशालेचे प्राचार्य मनोहर गुलगुंजी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रशालेतील 18 विद्यार्थिनींना संस्थेचे अध्यक्ष डॉ.सतीश घाळी, एल. टी. नवलाज, प्राचार्य मनोहर गुलगुंजी यांच्या हस्ते सायकल वितरण करण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी एल. टी. नवलाज, कलाशिक्षक दत्ता लोहार, कल्पना पाटील यांनी सायकल मंजूरीसाठी प्रयत्न केल्याबद्दल प्रशालेमार्फत सत्कार करण्यात आला. श्री. नवलाज यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात कौशल्य प्राप्त करून अत्युच्च स्थान मिळवावे असा संदेश दिला. अध्यक्ष डॉ.सतीश घाळी यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांनी योग्य दिशा पकडून ध्येय साध्य करावे असा मौलिक विचार व्यक्त केला. सुहास पुजारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक बी.जी. कुंभार यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी माजी मुख्याध्यापक एस. एम. बागेवाडी, राजेंद्र पाटील, वैशाली कागवाडे, पार्वती पाटील, शेखर गवळी, विजयकुमार शेडगे, बाळासाहेब खरात, पुंडलिक पाटील, महारू भोये, देवनाथ महाले, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.