यूपीएससीत यश मिळवलेले दिलिपकुमार देसाई यांचा विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र
साधना प्रशालेत भारतीय महसूल सेवेमध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार
गडहिंग्लज ( महादेव तुरंबेकर ) : विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास बाळगावा, संयम पाळावा व अखंड अभ्यास करावा हेच यशाचे गमक आहे, असे प्रतिपादन युपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या जांभुळवाडी (तालुका गडहिंग्लज) येथील दिलीपकुमार कृष्णा देसाई यांनी केले.
येथील साधना ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे माजी विद्यार्थी दिलिपकुमार देसाई यांचा यु. पी. एस. सी परीक्षेत ऑल इंडिया क्रमवारीत ६०५ वा क्रमांक आला. तसेच त्यांची भारतीय महसूल सेवेत (IRS ) निवड झाल्याबद्दल त्यांचा साधना प्रशालेमार्फत भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव जे. बी. बारदेस्कर होते. यावेळी श्री. बारदेस्कर यांच्या हस्ते श्री.देसाई व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र देताना दिलीपकुमार देसाई पुढे म्हणाले, शालेय वयातच अधिकारी होण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न उराशी बाळगुन सकारात्मक वाटचाल सुरू ठेवली. पहिल्या चार स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आले मात्र नव्या उमेदीने पुन्हा परीक्षा देऊन उत्तुंग यश मिळवले असे सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य आय. पी. कुटिन्हो यांनी केले. यावेळी जे. बी. बारदेस्कर, पर्यवेक्षक अरविंद बारदेस्कर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत इयत्ता बारावीमध्ये यश मिळवलेल्या तेजस नाईक, श्रावणी अस्वले, सृष्टी कमते, आयशा भुतेलो, प्रथमेश कोरे, आदिती सीताप, दर्शना शहा, कोमल पुरोहीत, ऋषीकेश माळी, अनुज घेवडे या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
संस्था सचिव जे. बी. बारदेस्कर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन जे. के. साज व निहाल मकानदार यांनी केले. आभार अरविंद बारदेस्कर यांनी मानले. कार्यक्रमास सायन्स विभागप्रमुख आर. डी. लांबोर, व्होकशनल विभागप्रमुख ए. जी. देशमुख, कॉमर्स विभागप्रमुख सौ.वैशाली भिऊंगडे, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थत होते.