ठाकरे शिवसेनेच्या वतीने निवेदन ; बालरोग तज्ञही नेमण्याची मागणी
आजरा (हसन तकीलदार) : आजऱ्यातील मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालयात नवीन डायलेसिस सेंटर सुरु करण्यात आले आहे. त्याबद्दल सर्वत्र कौतुक व समाधान व्यक्त होत आहे. सर्वसामान्य, गरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयात डायलेसिसचा खर्च न परवाडणारा आहे. ग्रामीण रुग्णालयात डायलेसिस सेंटर सुरु झाल्यामुळे सर्वसामान्य, गरीब रुग्णांना याचा चांगला लाभ होत आहे. परंतु या सेंटरमध्ये जर एखादा रुग्ण अत्यवस्थ झाला किंवा प्रकृती गंभीर झाली तर त्या रुग्णावर उपचार करण्यासाठी एम. डी. मेडिसिन डॉक्टर उपलब्ध नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होऊ शकते, यासाठी रुग्णालयात कायमस्वरूपी एम. डी मेडिसिन डॉक्टर नेमण्यात यावा अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीने निवेदनातून केली आहे. सदर निवेदन तालुका प्रमुख युवराज पोवार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागातून लहान मुले-मुली आजारी पडल्यानंतर त्यांचे पालक उपचारासाठी येथे घेऊन येतात. परंतु या ठिकाणी कायमस्वरूपी बालरोगतज्ञ नसल्यामुळे या बालकांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात अथवा गडहिंग्लजला न्यावे लागते, खाजगी दवाखान्यातील उपचार हे गरीब, सामान्य कुटुंबाना परवडणारे नाही. कायमस्वरूपी बालरोतज्ञ डॉक्टर नसलेने लहान मुलाबरोबर पालकांचेही हाल होतात. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे कायमस्वरूपी बालरोतज्ञ व एम.डी.मेडिसिन डॉक्टरांची नेमणूक करावी असे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर तालुकाप्रमुख युवराज पोवार, युवा सेना उपजिल्हाप्रमुख महेशपाटील, हरिश्चंद्र व्हरकटे, अनपाल तकीलदार, बिलाल लतीफ, रवी सावंत, पांडू केसरकर, बबन चौगुले आदींच्या सह्या आहेत.