टोळीने मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणल्याचा पोलिसांचा संशय
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथील एका बँकेच्या एटीएम मशीनमधून आपल्या खात्यावर बनावट नोटा डिपॉझिट केल्याप्रकरणी अटक केलेल्या आकाश रिंगणे या संशयिताकडून तपासात धक्कादायक माहिती प्राप्त झाली असून बनावट नोटा चलनात आणणारी आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गडहिंग्लज पोलिसांनी नितीन भैरु कुंभार (रा. कुंभार गल्ली गडहिंग्लज), अशोक महादेव कुंभार ( चिकोडी, जि. बेळगाव), दिलीप सिद्धाप्पा पाटील (रा. बिद्रेवाडी, ता.हुक्केरी, जि. बेळगाव) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की, गडहिंग्लज येथील एका बँकेच्या एटीएम मशीनमध्ये आकाश रिंगणे याने दिनांक १७ जून रोजी रात्री पाचशे रुपयांच्या एकूण १७५०० रुपयांच्या बनावट नोटा आपल्या खात्यावर डिपॉझिट केल्याचे बँकेच्या लक्षात आले होते. बँकेचे मॅनेजर गौरव खरबुडे यांच्या फिर्यादीवरून आकाश याला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली होती. त्याने इतर साथीदारांच्या मदतीने बनावट नोटा चलनात आणल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे पोलिसांनी गतीने तपास करत वरील तिघांना अटक केली आहे.
या चौघांच्या अटकेनंतर बनावट नोटा चलनात आणणारी आंतरराज्य टोळी असल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले असून या टोळीने मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणातील संशयित अशोक कुंभार याला यापूर्वी देखील बनावट नोटा प्रकरणी अटक करण्यात आली होती. तो याप्रकरणी सहा वर्षे तुरुंगात शिक्षा तर दुसरा संशयित दिलीप पाटील हा अपहरण व खंडणी सारख्या गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आला आहे. या दोघाही संशयितांची मैत्री तुरुंगात असताना झाली होती. पुन्हा या दोघांनी बनावट नोटा चलनात आणण्याचा अवैध व्यवसाय करत असल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय सिंदकर अधिक तपास करत आहेत.