Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजऱ्यात कॅशू मॅन्युफॅक्चर वेलफेअर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

काजू प्रक्रिया उद्योगातील विविध समस्यांवर चर्चा व तज्ञाकडून मार्गदर्शन 



आजरा (हसन तकीलदार):
आजरा तालुक्यातील पांढरे सोने म्हणून प्रसिद्ध असलेले काजू हे मुख्यत्वे करून नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या काजू बियावर प्रक्रिया करून निर्यात व विक्री केली जाते. काजू बियावर प्रक्रिया करणारे अनेक कारखाने तालुक्यात आहेत. त्यांची कॅश्यू मॅन्युफॅक्चर्स वेलफेअर असोसिएशन मागील तीन वर्षापासून कार्यरत आहे. यामध्ये नोंदणीकृत एकूण 163 सभासद आहेत. तालुक्यात छोटे-मोठे मिळून अंदाजे 300 ते 350 उद्योजक या काजू प्रक्रिया व्यवसायात आहेत. या उद्योजकांच्या अडी अडचणी, समस्या तसेच शासकीय पातळीवरील प्रश्न सोडवण्याचे काम या असोसिएशन मार्फत अगदी चोखपणे केले जात असल्याचे सांगण्यात आले. या असोसिएशची 3री वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खोराटे रेस्टोरंट आंबोली रोड, आजरा येथे पार पडली.




 

उपस्थित सभासदांचे व पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक प्रकाश कोंडूस्कर यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी असोसिएशनची यशोगाथा मांडली. ते म्हणाले की, असोसिएशन मार्फत जवळ जवळ 45 उद्योजकांना 2•5%एस. जी. एस. टी. परतावा मिळणेकामी सहकार्य केले. त्याचप्रमाणे उद्योजकांनी आपले व्यवहार जी. एस. टी. बिलानुसारच करावीत. बिलानुसार व्यवहार केला तर कायदेशीर कारवाई करणे सोयीचे होईल व फसवणूक होणार नाही असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे परदेशी काजू बी,तयार माल खरेदी -विक्री व आयात -निर्यात संदर्भात आनंद भेसडिया यांनी मार्गदर्शन केले. तर वीज वितरण कंपनीकडून वारंवार होल्टेज कमी जादा झालेने यंत्रावर परिणाम होऊन नुकसान होते यासाठी क्रायकार्ड या कंपनीचे रिजनल मॅनेजर मानस पॉल यांनी स्टॅबिलायझचे महत्व याबाबत विशेष मार्गदर्शन केले.



वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा तोटा पत्रक वाचन सचिव परेश पोतदार यांनी केले. याबरोबरच संचालक मंडळास असोसिएशच्या हिताचे निर्णय घेणे व पोटनियम दुरुस्तीचे अधिकार देणेची मान्यता एकमताने या सभेत मंजूर करण्यात आली. यावेळी पांडुरंग जोशीलकर, अमोल मुरुकटे, दशरथ बोलके, भूषण नांदवडेकर, उत्तम सलामवाडे यांनी आपली मनोगत व्यक्त करीत असोसिएशनच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.



सभेस विकास फळणेकर, संदीप पवार, निशांत जोशी, दयानंद देवलकर, विश्वास जाधव, सुरेश चौगले, भास्कर निकम, उद्योजक महादेव पवार, बाबुराव मांजरेकर यासह सर्व सभासद उपस्थित होते.शेवटी उपाध्यक्ष दयानंद भुसारी यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.